यवतमाळात उत्साहात घटस्थापना; शतकीय दुर्गोत्सवाला देखाव्यांची झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:17 PM2019-09-30T12:17:10+5:302019-09-30T12:17:36+5:30
देशातला दुसऱ्या क्रमांकाचा दुर्गोत्सव म्हणून यवतमाळचा दुर्गोत्सव ओळखला जातो. या उत्सवाला १०० वर्षांची परंपरा लाभली आहे. या परंपरेत मानाचा तुरा खोवण्याचे काम दुर्गोत्सव मंडळांच्या देखाव्यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : देशातला दुसऱ्या क्रमांकाचा दुर्गोत्सव म्हणून यवतमाळचा दुर्गोत्सव ओळखला जातो. या उत्सवाला १०० वर्षांची परंपरा लाभली आहे. या परंपरेत मानाचा तुरा खोवण्याचे काम दुर्गोत्सव मंडळांच्या देखाव्यांनी केले आहे. यंदा पावसाचा व्यत्यय असूनही विविध देखावे साकारण्यात आले आहे.
बालाजी चौकस्थित बालाजी मंडळ दुर्गादेवी उत्सव मंडळाचे ५४ वे वर्षे आहे. या मंडळाने वैष्णोदेवी धाम पहाडात साकारला आहे. याकरिता ७० फूट उंच पहाड बाशाच्या मदतीने तयार केला आहे. संपूर्ण पहाडाला प्रदक्षिणा घातल्यानंतर माँ वैष्णोदेवीचे दर्शन भक्तांना घडणार आहे. यामुळे हे अद्भुत दृश्य पाहून माँ वैष्णोदेवीचे दर्शन झाल्याचा भास होणार आहे.
वडगावातील सुभाष क्रीडा मंडळाचे ५३ वे वर्षे आहे. या मंडळाने पृथ्वी वाचविण्याचा संदेश देण्यासाठी पहाड साकारला आहे. त्यावर पृथ्वी साकारली आहे. यावरून खळखळणारे झरे, वृक्ष आणि पृथ्वीला आधार देणारे हात साकारण्यात आले. पाणी बचतीसोबत वृक्ष संवर्धनाचा संदेशही दिला आहे. बंगईवर बसलेली देवी, वाघ आणि बछडे साकारले आहे.
वडगावातील सिद्धीविनायक नगरातील माँ जगदंबा दुर्गोत्सव मंडळाचे १७ वे वर्षे आहे. या मंडळाने वेरूळची अजिंठा लेणी तसेच हेमाडपंती कैलास मंदिर साकारले आहे. त्यासाठी बंगाली कारागिरांनी मेहनत घेतली.
एकता दुर्गोत्सव मंडळाचे ३३ वे वर्षे आहे. या मंडळाने माँ दुर्गा वृद्धांची आधार बनल्याचा देखावा साकारला आहे. वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविणाऱ्या मुलांची आणि सुनांची चांगलीच कानउघाडणी करणारा हा देखावा आहे.
लोकमाता दुर्गोत्सव मंडळाचे ३४ वे वर्षे आहे. महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजे, असा संदेश देखाव्यातून मांडण्यात आला आहे. जय हिंद दुर्गोत्सव मंडळाचे ५६ वे वर्षे आहे. या मंडळाने मंदिराला आकर्षक कलशाचे रूप दिले आहे. या सोबतच सामाजिक उपक्रमावर प्राधान्याने भर दिला आहे.
शिवाजी नगरातील दुर्गोत्सव मंडळाने अमरनाथची गुफा आणि त्यात बर्फाची पिंड साकारली आहे. या मंडळाचे तिसरे वर्ष आहे. छोटी गुजरी चौकातील एकता दुर्गोत्सव मंडळाचे ४८ वे वर्षे आहे. या मंडळाने ५१ फूट उंच जहाज साकारले आहे.
दत्त चौकातील बब्बी पहेलवान सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाचे ७८ वे वर्षे आहे. या मंडळाने यावर्षी फायबरचे मंदिर बनविले आहे. या ठिकाणी ३५ वर्षांपासून अखंड दीप तेवत ठेवला आहे. राणी झाँशी बंगाली दुर्गोत्सव मंडळाचे ८ वे वर्षे आहे. या मंडळाने थेट कोलकत्यावरून माँ दुर्गेची मूर्ती यवतमाळात आणली आहे.
झाँकीनी लक्ष वेधले
रविवारी घटस्थापनेच्या दिवशी यवतमाळात विविध झाँकी साकारण्यात आल्या. ढोलताशा पथक आणि परंपरागत वारकरी मंडळीने माँ भवानीची स्थापना केली. काही मंडळांनी ऐतिहासिक दृश्यांना उजाळा दिला.