दुर्गोत्सवाच्या गर्दीने मोडले रेकाॅर्ड; देखाव्यांचे आकर्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 02:51 PM2023-10-21T14:51:29+5:302023-10-21T14:51:46+5:30
अन्नदान, सुरक्षाव्यवस्था आणि प्रबोधनपर फलकांनी लक्ष वेधले
यवतमाळ : देशातील दुसऱ्या क्रमांकाचा दुर्गोत्सव म्हणून यवतमाळचा दुर्गोत्सव ओळखला जातो. हा दुर्गोत्सव आपल्या नजरेत कैद करण्यासाठी भक्तांचे लोंढे यवतमाळच्या दिशेने आगेकूच करीत आहे. यातून शहरातील गर्दी वाढली आहे. गर्दीने अर्थव्यवस्थेत भर पडला आहे.
दुर्गोत्सव मंडळाचे देखावे जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे. या देखाव्यांना प्रत्यक्षात पाहण्यासाठी ग्रामीण भागातून छोट्यामोठ्या वाहनाच्या माध्यमातून भक्तगण यवतमाळात दाखल होत आहे. सायंकाळपासून ही गर्दी वाढण्यास सुरुवात होते.
वडगावमधील सुभाष क्रीडा दुर्गोत्सव मंडळाने कुरुक्षेत्राचा देखावा साकारला आहे. या देखाव्याला पाहण्यासाठी गर्दी उसळत आहे. याशिवाय याच मार्गावरील राणाप्रताप गेट स्थित माँ जगदंबा दुर्गोत्सव मंडळाने अयोध्येच्या राममंदिराचा नयनरम्य देखावा साकारला आहे. या देखाव्याला आपल्या नजरेत समावून घेण्यासाठी भक्तांची गर्दी होत आहे. लोकमान्य चौकातील लोकमान्य दुर्गोत्सव मंडळाने माता पार्वतीचे भिल्लीनी रूप देखावा साकारला आहे. या देखाव्याला पौराणिक इतिहास लाभला आहे. मंडळाने तो प्रत्यक्षात साकारण्यावर भर दिला आहे.
मंडळापुढे मातेचे दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी भोजनदानासह उपवास साहित्य आणि मोफत दुधाचेही वाटप दुर्गोत्सव मंडळाकडून करण्यात येत आहे. यामुळे उपवास असला तरी भक्तगण निश्चिंत असतात.
स्थानिक गांधी चौकातील गांधी चौक दुर्गोत्सव मंडळाने नऊ दिवस अन्नदानाची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी दररोज सात ते आठ हजार भाविकांच्या अन्नदानाची व्यवस्था होते. नवशक्ती दुर्गोत्सव मंडळ गणपती मंदिर चौकामध्ये ५०१ अखंड दीपज्योत तेवत ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणीदेखील अन्नदान होते. या कामामध्ये शेकडो कार्यकर्ते अविरत झटत आहेत.
बालाजी चौक दुर्गोत्सव मंडळानेही दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आकर्षक देखावा साकारला आहे. या ठिकाणी कन्या भोजनासह सामाजिक उपक्रमावर भर देण्यात आला आहे.
सौरमालेतील ग्रहाचा अभ्यास
शिवाजीनगर दुर्गोत्सव मंडळाने चांद्रयान-३ हा देखावा साकारला आहे. यामध्ये सौरमालेतील अंतराळ दर्शन देखावा साकारण्यात आला आहे. या ठिकाणी सूर्य, बुधग्रह, शुक्र, शनि, नेपचून यासारख्या सर्व ग्रहाची मांडणी या ठिकाणच्या देवीच्या गाभाऱ्यात साकारण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक ग्रहाची माहिती आणि त्या ग्रहावरील ध्वनी प्रत्यक्षात मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे. संजय चोले यांनी याला पूर्णरूप दिले आहे.
शीतला मातेच्या दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी
आठवडी बाजारस्थित शीतला माता मंदिरामध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी होत आहे. शीतला मातेला जल चढविण्यासाठी महिलांची सर्वाधिक गर्दी या ठिकाणी असते. हिंदुस्थानी दुर्गोत्सव मंडळाने या ठिकाणी उपवासाच्या साहित्यची व्यवस्था केली आहे.