कोरोना काळात केवळ १२५४ तरुणांना मिळाला रोजगार, तर नोंदणी सव्वालाख बेरोजगारांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 05:00 AM2020-12-21T05:00:00+5:302020-12-21T05:00:17+5:30
प्रत्यक्षात जिल्ह्यात बेरोजगारांचा आकडा यापेक्षा कितीतरी मोठा आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत जिल्हा उद्योग केंद्राकडे तब्बल १ लाख १७ हजार ३२१ तरुणांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यातील १२५४ तरुणांना रोजगार मिळाला. मात्र उर्वरित तरुणांचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे. नोंदणी केल्यावरही रोजगार मिळत नाही, त्यामुळे आम्ही नोंदणीच करीत नाही, असे अनेक तरुणांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेलेला असतानाच नवीन तरुणांना रोजगार काेठून मिळणार असा प्रश्न होता. मात्र राज्यात या काळात तब्बल दीड लाख बेरोजगारांना रोजगार दिल्याचा दावा राज्याच्या कौशल्य विकास विभागाने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा आढावा घेतला असता १२५४ तरुणांना रोजगार मिळाल्याची बाब जिल्हा उद्योग केंद्रातून समोर आली.
प्रत्यक्षात जिल्ह्यात बेरोजगारांचा आकडा यापेक्षा कितीतरी मोठा आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत जिल्हा उद्योग केंद्राकडे तब्बल १ लाख १७ हजार ३२१ तरुणांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यातील १२५४ तरुणांना रोजगार मिळाला. मात्र उर्वरित तरुणांचे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे. नोंदणी केल्यावरही रोजगार मिळत नाही, त्यामुळे आम्ही नोंदणीच करीत नाही, असे अनेक तरुणांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हा उद्योग केंद्रातील नोंदणीच्या आकडेवारीपेक्षाही जिल्ह्यातील बेरोजगारांची संख्या खूप मोठी असण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात चार मेळावे
जिल्ह्यात आतापर्यंत चार रोजगार मेळावे पार पडले. त्यात उमेदवारांचाही उत्तम प्रतिसाद होता. पूर्वीप्रमाणे आता पदभरतीसाठी आमच्याकडून याद्या न मागवता संबंधित विभाग आपल्या स्तरावर भरती करते, असे कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी देशपांडे म्हणाले. तर रोजगारांच्या नोंदी आणि मेळावे याबाबत विभागाचे पूर्ण प्रयत्न सुरू असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त वैशाली पवार यांनी दिली.
रोजगार मेळाव्यांना प्रतिसाद
शासनाने महास्वयं पोर्टल सुरू करून त्यावरच बेरोजगारांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे नोंदणीसाठी जिल्हा उद्योग केंद्रात गर्दी दिसत नाही. शिवाय नोंदणीचे नूतनीकरणही पोर्टलवरच होत आहे. दरम्यान या पोर्टलच्या माध्यमातूनच रोजगार मेळावेही घेतले जात आहे. त्यात उमेदवारांसह विविध कंपन्या सहभागी होत आहेत. त्यासाठी व्हिडिओ काॅन्फरन्सची सुविधा करून दिली जात आहे. मेळाव्याला उमेदवारांचा प्रतिसाद उत्तम असला तरी एकदा निवड झाल्यानंतर संबंधित ठिकाणी जाणे, कामाचे स्वरुप याबाबत अडचणी येत आहेत.
तरूण काय म्हणतात?
शासनाने अनेक जागांसाठी फाॅर्म भरून घेतले. पण प्रत्यक्षात भरती केलेली नाही. एमपीएससी, पोलीस भरतीची परीक्षाच झाली नाही. शासनाची घोषणा खरी नाही.
- सागर आडे, यवतमाळ
मी पोलीस भरतीकरिता अर्ज भरला आहे. तयारीही केली आहे. पण अद्याप परीक्षा घेतली गेली नाही. एम्लाॅयमेंटकडे नोंदणी केली तरी प्रतिसाद मिळत नाही. म्हणून मी नोंदणीच केली नाही.
- बबलू राहुत, यवतमाळ
सर्वांची परिस्थिती सारखीच आहे. मीही रेल्वेचा फाॅर्म भरला आहे. आता परीक्षेची वाट पाहत आहे. रोजगार वाढविण्यासाठी शासनाने आणखी चांगल्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. नोंदणी करून उपयोग होत नाही. - नेहा मेश्राम, यवतमाळ