वणीतील धूळ आणि धूर प्रदूषणाने मानवी जीवन धोक्यात; खाण बाधित क्षेत्रात गंभीर आजार बळावले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 03:57 PM2022-12-12T15:57:10+5:302022-12-12T16:04:24+5:30
उपाययोजनाच नाही
संतोष कुंडकर
वणी (यवतमाळ) : कोळसा उत्खनन आणि त्याच्या वाहतुकीमुळे वणी परिसरात धूळ प्रदूषणाचा प्रंचड प्रकोप पहायला मिळतो. यासोबत या भागात असलेल्या चुना भट्ट्यांच्या धुरांड्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे केवळ मानवी जीवनच नाही तर पशुधन आणि शेती व्यवसायदेखील धोक्यात आला आहे. असे असताना याबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने या भागातील मानवी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वणी तालुक्यातील गावांची संख्या १६२ आहे. मात्र, कोळसा खाणी व अन्य उद्योगांमुळे १०२ गावे बाधित झाली आहेत. या गावकऱ्यांना अनंत अडचणी, समस्यांचा सामना करावा लागत आहे. १२ कोळसा खाणी आहेत. या खाणीतील कोळसा उत्खनन आणि त्याची वाहतूक यामुळे धूळ प्रदूषणात मोठी भर पडत आहेत. मुळात धुळीचे व्यवस्थापन करण्याची संपूर्ण जबाबदारी वेकोलिची असताना वेकोलि मात्र थातूरमातूर उपाययोजना करीत असल्याचे विदारक चित्र वणी तालुक्यात पहायला मिळते. धुळीचे व्यवस्थापन करण्यासाठी डस्ट अरेस्टरचा वापर करायला हवा. मात्र, ती यंत्रणाच वेकोलिकडे नाही. किंबहुना ती असेल तरी त्याचा वापर न करता धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केवळ जलसिंचन केले जाते. कोळसा वाहतुकीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कोळशाची धूळ साचते. यावर पाणी मारल्यानंतर तेथे चिखल तयार होतो. त्यामुळे दुचाकींचे अपघात घडतात. रस्त्यावर पाणी मुरते. त्यातून रस्ते फुटतात.
हजाराे हेक्टर शेतजमीन बंजर
धूळ प्रदूषणामुळे कोळसा वाहतुकीच्या रस्त्यावरील हजारो हेक्टर शेतजमीन बंजर झाली आहे. या जमिनीची उत्पादन क्षमता घटली आहे. पिकांवर कोळशाची धूळ बसल्याने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. त्यातून पिकांच्या उत्पादनात घट येते. दरवर्षीच या भागातील शेतकऱ्यांना शेती व्यवसायात लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागते. असे असताना बाधित शेतकऱ्यांना वेकोलिकडून नुकसानीचा मोबदला म्हणून एक छदामही मदत दिला जात नाही.
विविध आजारांची बाधा
धूळ प्रदूषणामुळे दमा, त्वचा रोग, पोटाचे विकार, दृष्टीदोष, बहिरेपणा या आजारांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. प्रदूषणाचा पशुधनावरदेखील परिणाम होत आहे. कोळसा वाहतुकीमुळे जनावरांच्या चाऱ्यावर धूळ बसते. पाळीव जनावरे मग हाच चारा खातात. त्यातून त्यांना वेगवेगळे आजार जडत आहेत.
प्रोसोपीस, ज्युलीफ्लोरा वनस्पती धोकादायक
कोळसा उत्खननानंतर खाणीतून निघणाऱ्या मातीचे अजस्र ढिगारे वणी तालुक्यात उभे करण्यात आले आहेत. नियमानुसार, या ढिगाऱ्यांवर हरित पट्टा तयार करण्यासाठी कडुनिंब, सीसू, आवळा, आंबा, कदंब, जांभूळ, बेहडा, बदाम यासारखी झाडे लावणे अपेक्षित होते. मात्र, वेकोलिने अशा कोणत्याही झाडांची लागवड केल्याचे दिसून येत नाही. याउलट धोकादायक असलेली प्रोसोपीस, ज्युलीफ्लोरा ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर खाण क्षेत्रात उगवली आहे. या घनदाट वनस्पतींमुळे वणी परिसरात वाघांचा संचार वाढला आहे. सोबतच इतरही हिंस्र जनावरांची संख्या वाढीस लागली आहे.
चुनाभट्ट्यांच्या धुराने गावकरी बेजार
वणीपासून अगदी जवळ असलेल्या राजूर कॉलरी येथे ५० पेक्षा अधिक चुनाभट्ट्या आहेत. यापैकी आता १२ चुनाभट्ट्या सुरू आहेत. या चुनाभट्ट्याच्या धुरांड्यातून निघणाऱ्या धुरामुळे केवळ राजूर कॉलरी येथीलच नाही तर अवतीभोवतीची आठ ते १० गावे बेजार आहेत. या नागरिकांना २४ तास या धुराचा सामना करावा लागत आहे.
कोळशाची वाहतूक होणाऱ्या रस्त्यालगतच्या शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. खाणीलगतची गावेही प्रदूषणाने बेजार आहेत. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यासाठी आपत्तीच्या धर्तीवर वेकोलिने धोरण ठरवायला हवे. खाण बाधित क्षेत्रातील नागरिकांची नियमितपणे आरोग्य तपासणी करून त्यांच्या उपचाराचा खर्चदेखील वेकोलिने सीएसआर फंडातून करायला हवा.
विजय पिदूरकर, माजी सदस्य खनिज विकास प्रतिष्ठान.