दत्त चौकातील भाजी मंडीत युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 11:31 PM2018-02-16T23:31:59+5:302018-02-16T23:32:20+5:30

गजबजलेल्या दत्त चौकातील भाजी मंडीच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता १९ वर्षीय युवकाचा सात जणांनी धारदार शस्त्रांनी भोसकून निर्घृण खून केला. खुनाच्या या घटनेने यवतमाळातील गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवाया पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

Dutt Chowk in the Bhaji Mandal youth murder | दत्त चौकातील भाजी मंडीत युवकाचा खून

दत्त चौकातील भाजी मंडीत युवकाचा खून

Next
ठळक मुद्देशस्त्राचे १३ वार : बारावीचा विद्यार्थी, तीन मारेकऱ्यांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गजबजलेल्या दत्त चौकातील भाजी मंडीच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता १९ वर्षीय युवकाचा सात जणांनी धारदार शस्त्रांनी भोसकून निर्घृण खून केला. खुनाच्या या घटनेने यवतमाळातील गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवाया पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
क्षितीज राजेश भगत (१९) असे मृताचे नाव असून तो सुराणा ले-आऊट, अंबिकानगर पाटीपुरा यवतमाळ येथील रहिवासी आहे. क्षितीज हा धामणगाव रोड स्थित जाजू महाविद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. भाजी मंडीच्या प्रवेशद्वारावर सात जणांनी त्याला गाठले व काही एक कळण्याच्या आत त्याच्या पोटावर, पाठीवर व बगलेत चाकूचे सपासप १३ वार केले. क्षणात तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या घटनेने भाजी मंडी परिसरात खळबळ निर्माण झाली. अवधूतवाडी पोलिसांना लगेच पाचारण करण्यात आले. क्षितीजला रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. सुरुवातीला क्षितीजची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. अखेर घटनास्थळी सापडलेल्या त्याच्या मोबाईलवरून संपर्क करून त्याची ओळख पटविण्यात आली.
मृत क्षितीजची बहीण स्वाती हिच्या फिर्यादीवरून गोलू उर्फ प्रणव राजू मेश्राम, सिनू उर्फ राहूल उर्फ सिनू संजय शिंदे, आकाश वाढई तिन्ही रा. अंबिकानगर, देवा, अरविंद भिमकुंड दोन्ही रा. घाटंजी, प्रसन्न उर्फ दाऊ प्रमोद मेश्राम रा. सेजल रेसीडेन्स, सत्यम डोंगरे या सात जणांविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात भादंवि १४७, १४८, १४९, ३०२, १२० ब कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. खुनामागील नेमके कारण अस्पष्ट आहे. घटनास्थळी मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी महादेव मंदिर भागातून एकाला ताब्यात घेतले. त्यातूनच आरोपी हे दाऊच्या आजीकडे आर्णीत लपून असल्याची माहिती मिळाली. त्याची खातरजमा करण्यासाठी टोळी विरोधी पोलीस पथकाचे उपनिरीक्षक संतोष मनवर आपल्या सहकाऱ्यांसह पाठोपाठ आर्णीत पोहोचले. तेथे गोलू व त्याचे साथीदार शिवाजी चौकातील एका घरात दडून असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या घराला वेढा घातला. यावेळी आरोपीने अचानक मनवर यांच्यावर चाकूहल्ला केला. तर मनवर यांनीही आरोपीच्या दिशेने लगेच गोळी झाडली. ही गोळी गोलूच्या डाव्या मांडीवर लागली. त्यात तो जखमी झाला. यावेळी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींविरुद्ध आर्णी पोलीस ठाण्यात भादंवि ३०७, ३५३, ३३२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रानुसार, गुरुवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास क्षितीज व आरोपी गोलू आणि साथीदारांचे नालंदा चौकात भांडण झाले. याच भांडणाचा वचपा म्हणून क्षितीजचा भरदिवसा निर्घृण खून करण्यात आला. क्षितीज हा कुटुंबात एकटाच होता. त्याला तीन बहिणी आहेत. त्याचे आई-वडील रोजमजुरीचे काम करतात. क्षितीजच्या खुनामागील नेमके कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. पोलीस विविध पैलूंनी या गुन्ह्याचा तपास करीत आहे.
बघा, गुंडांची हिंमत केवढी वाढली, पोलिसांवर चौथा हल्ला
राजकीय आशीर्वादाने चालणारी यवतमाळ शहरातील गुन्हेगारी पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पोलिसांचा वचक संपल्याने गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांची हिंमत चांगलीच वाढली आहे. ते आता पोलिसांवर हल्ला करण्यासही मागे-पुढे पाहत नसल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी क्षितीज भगतच्या खुनातील आरोपीला पकडण्यासाठी आर्णीत गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर यांच्यावर आरोपी गोलू मेश्राम व साथीदारांनी चाकूहल्ला केला. सावध असलेल्या मनवर यांनी लगेच आपल्या सर्व्हीस रिव्हॉल्वरमधून गोलूच्या दिशेने गोळी झाडली. ती त्याच्या पायाला लागली. यवतमाळच्या गुन्हेगारी वर्तुळात फौजदार संतोष मनवर यांचा बराच दबदबा आहे. मात्र त्यांच्यावरही खुनातील आरोपी हल्ला करीत असतील तर अन्य सामान्य पोलीस कर्मचाºयांचे काय? असा प्रश्न उपस्थित होतो. विविध गुन्ह्यातील तपासाच्या निमित्ताने एसपींच्या सतत संपर्कात राहणाऱ्या अ‍ॅन्टी गँग सेलमधील उपनिरीक्षकावरच गुंड हल्ला करू शकतात तर ग्रामीण भागातील पोलिसांची अवस्था काय असेल याची कल्पना येते.

Web Title: Dutt Chowk in the Bhaji Mandal youth murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून