निर्गुडा नदीत बुडाल्याने बालकाचा मृत्यू
By admin | Published: April 3, 2017 12:33 AM2017-04-03T00:33:20+5:302017-04-03T00:33:20+5:30
येथील निर्गुडा नदीत बुडून एका १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैैवी घटना रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
शोककळा : पोहोण्याचा मोह जीवावर बेतला
वणी : येथील निर्गुडा नदीत बुडून एका १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैैवी घटना रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
आर्यन मनोज जुमळे असे मृत बालकाचे नाव असून तो स्थानिक तेली फैल भागातील रहिवासी आहे. तो नांदेपेरा मार्गावरील पालिकेच्या शाळा क्रमांक पाचमध्ये ईयत्ता चौैथीचा विद्यार्थी होता. रविवारी शाळेला सुटी असल्याने काही मित्रांसमवेत तो येथील निर्गुडा नदीत पोहण्यासाठी गेला. मात्र पोहत असताना खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेने हादरलेल्या त्याच्या मित्रांनी घरी जाऊन घटनेची माहिती त्याच्या पालकांना दिली. मृत आर्यनचे वडिल मनोज जुमळे यांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. आर्यनला नदीच्या पात्रातून बाहेर काढून तातडीने येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तेथे त्याला मृत घोषित केले. मृत आर्यन हा अतिशय तल्लख बुद्धीचा विद्यार्थी होता. अभ्यासात तो हुशार होता. त्याचे आई-वडिल मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवितात.
विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी आर्यनच्या तीन वर्षीय लहान भावाचे आजाराने निधन झाले. त्यानंतर लगेच ही दुर्घटना घडल्याने संपूर्ण जुमळे कुटुंबिय शोकसागरात बुडाले आहे. स्थानिक निर्गुडा नदीच्या बंधाऱ्याजवळ चार महिन्यापूर्वीच एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. (कार्यालय प्रतिनिधी)