२२ शाळांकडे ई-वर्ग जमीन
By Admin | Published: July 25, 2014 12:04 AM2014-07-25T00:04:46+5:302014-07-25T00:04:46+5:30
तालुक्यातील सव्वाशेच्यावर शाळांपैकी २२ शाळांकडे ई-वर्ग जमिनीची मालकी आहे. यातील काही शाळा जमिनीचा हर्रास करतात. इतर शाळा मात्र स्वत: पुढाकार घेत जमिनीतून उत्पन्न घेतात.
कळंब : तालुक्यातील सव्वाशेच्यावर शाळांपैकी २२ शाळांकडे ई-वर्ग जमिनीची मालकी आहे. यातील काही शाळा जमिनीचा हर्रास करतात. इतर शाळा मात्र स्वत: पुढाकार घेत जमिनीतून उत्पन्न घेतात. मागील तीन वर्षात या शाळांनी ६ लाख २४० रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
तालुक्यातील सावरगाव, धोत्रा, उमरी, परसोडी(बु.), पालोती, मेटीखेडा, डोंगरखर्डा, झाडकिन्ही, अंतरगाव, कामठवाडा, वटबोरी, पोफळणी, कोठा, नरसापूर, कळंब, जोडमोहा, सोनेगाव, वंडली, पोटगव्हाण, परसोडी(खु.) व बेलोरी या शाळांकडे ई-वर्ग जमिनीचा ताबा आहे. मागील तीन वर्षात या शाळांनी सहा लाख २४० रूपये मिळकत कमावली आहे. तसेच सर्व शाळांजवळ ई-वर्ग जमिनीतून मिळालेल्या उत्पन्नापैकी ११ लाख ७२ हजार १७९ रुपये अजुनही शिल्लक आहे. विशेष म्हणजे हाच पैसा शाळांनी विविध उपक्रमांवर खर्च केलेला आहे. जमिनीच्या उत्पन्नातून मिळालेल्या पैशातून अनेक शाळांनी विद्युत बील भरणे, मैदान साफ करणे, वॉल कंपाऊंड दुरुस्ती, शालेय साहित्य खरेदी, मैदान दुरुस्ती तसेच इतर कामांवर खर्च केल्याचे सांगण्यात आले.
उच्च प्राथमिक शाळा पहुर ईजारा येथील शाळेने ई-वर्ग जमिनीतून मिळालेला एकही पैसा कुठेही खर्च केलेला नाही. त्या शाळेजवळ आजच्या स्थितीत १ लाख २१ हजार २८८ रूपये जमा आहे. सर्वात जास्त निधी पालोती येथील उच्च प्राथमिक शाळेजवळ आहे. त्यांच्याजवळ २ लाख ७१ हजार ८०६ रूपये शिल्लक आहेत.
ज्या शाळेजवळ जमीन आहे, त्यापैकी ९ शाळा जमिनीचा हर्रास करतात. इतर शाळा जमिनीतून कशा पद्धतीने उत्पन्न घेतात याची माहिती शिक्षण विभागाजवळ नाही. तसेच प्राथमिक शाळा परसोडी(खु.) व उच्च प्राथमिक शाळा बेलोरी या शाळांजवळ ई-वर्गची किती जमीन आहे, याची माहिती नाही. त्याच बरोबर त्या जमिनीतून किती रूपयांचे उत्पन्न मिळाते, मिळालेल्या पैशाचे काय करण्यात आले, याची माहिती शिक्षण विभागाकडेही उपलब्ध नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते. कळंब येथील उच्च प्राथमिक कन्या शाळेने मिळालेले पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये टाकलेले आहे. ती रक्कम ४ हजार ५२७ रूपये एवढी आहे. (तालुका प्रतिनिधी)