‘जेडीआयईटी’मध्ये ई-यंत्र प्रयोगशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 09:57 PM2017-12-04T21:57:17+5:302017-12-04T21:57:36+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात आयआयटी मुंबईच्या पुढाकाराने ‘ई-यंत्र’ (एम्बेडेड सिस्टीम अँड रोबोटिक्स लॅब) प्रयोगशाळेची सुरुवात आॅनलाईन उद्घाटनाद्वारे झाली आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात आयआयटी मुंबईच्या पुढाकाराने ‘ई-यंत्र’ (एम्बेडेड सिस्टीम अँड रोबोटिक्स लॅब) प्रयोगशाळेची सुरुवात आॅनलाईन उद्घाटनाद्वारे झाली आहे. प्रमुख पाहुणे अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राममनोहर मिश्रा यांनी फीत कापून प्रयोगशाळेतील उपकरणांचे अनावरण केले. यावेळी जेडीआयईटीचे प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख डॉ. संजय गुल्हाने आदी उपस्थित होते.
भारतात कौशल्यपूर्ण व अधिक कार्यक्षम एम्बेडेड सिस्टीम व रोबोटिक्स अभियंते तयार करणे हा या उपक्रमाचा दृष्टिकोन आहे. त्याला भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने आयसीटी कार्यक्रमाद्वारे तथा राष्ट्रीय शैक्षणिक अभियानांतर्गत अनुदान उपलब्ध करून दिले आहे. महाविद्यालयातर्फे डॉ. संजय गुल्हाने यांनी प्रा. अभय राठोड, प्रा. बागवान फारूख व प्रा. सादिक फानन यांच्यासह गेल्या वर्षभरापासून या उपक्रमात सहभाग नोंदविला होता. आयआयटीने ई-यंत्र लॅब सेटअप इनिशिएटिव्ह (इएलएसआय) अंतर्गत या प्राध्यापकांच्या चमूला दोन चरणबद्ध प्रशिक्षणामध्ये सहभागी करून घेतले होते.
महाविद्यालयातील या प्रयोगशाळेतून विद्यार्थ्यांना एम्बेडेड सिस्टीम व रोबोटिक्सचे प्रगत ज्ञान मिळणार आहे. तसेच विविध प्रकारचे अप्लीकेशन्स तयार करून शेती उत्पादन, संरक्षण, घर, शहर देखभाल आणि सेवा उद्योग आदींच्या विकासासाठी काम करणे शक्य होणार आहे. राज्यातील निवडक महाविद्यालयांमध्ये एकाचवेळी या प्रयोगशाळांचे आॅनलाईन उद्घाटन आयआयटी बॉम्बेतर्फे करण्यात आले. उद्घाटनानंतर रोबोटिक किट्सचे प्रात्यक्षिक सादर झाले. प्रशिक्षण यशस्वी पूर्ण करणाºया प्राध्यापकांचा गौरव केला. महाविद्यालयाला प्रयोगशाळा मिळाल्याबद्दल डॉ. संजय गुल्हाने व चमूचे संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी कौतुक केले.