मारेगाव तालुक्यात भूकंपसदृश धक्के; नागरिक पडले घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 18:04 IST2025-02-16T18:04:04+5:302025-02-16T18:04:47+5:30

२० सेकंद धक्का जाणवला : तहसीलदाराने दिली भेट

Earthquake-like tremors felt in Maregaon taluka; Citizens rushed out of their homes | मारेगाव तालुक्यात भूकंपसदृश धक्के; नागरिक पडले घराबाहेर

Earthquake-like tremors felt in Maregaon taluka; Citizens rushed out of their homes

लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव :
तालुक्यातील कुंभा परिसरासह काही गावांना शुक्रवारी रात्री १०:१५ वाजण्याच्या सुमारास जमिनीखाली आवाज होऊन भूकंपसदृश धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, प्रशासनाच्या दप्तरी याची कोणतीही नोंद आढळून आली नाही. त्यामुळे हे धक्के नेमके कशाचे होते, याचा अद्यापही उलगडा झाला नाही.


मारेगाव तालुक्यातील कुंभा, पिसगाव, पांढरकवडा, नेत, चिंचाळा, वडगाव, मांगरूळ, आदी गावांमध्ये शुक्रवारी रात्री १०:१५ वाजता हे धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. १५ ते २० सेकंद हा धक्का जाणवला. यावेळी घरे हलली. भांडीही पडली. सोबतच जमिनीखाली आवाज आल्याचे काही नागरिकांनी सांगितले. ही घटना घडल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक नागरिक घराबाहेर पडले.


याबाबत मात्र केंद्र सरकारच्या भूकंप मापक यंत्रावर कोणतीही नोंद नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. शनिवारी दिवसभर तालुक्यात भूकंपाच्या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू होती. घटनेचे वृत्त कळताच तहसीलदार उत्तम निलावाड यांनी संबंधित गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला.


जमिनीखाली कोळसा
शुक्रवारी रात्री ज्या गावात भूकंप झाल्याची चर्चा होती, त्या गावाची व परिसराची कोळसा पट्टा म्हणून शासन दप्तरी नोंद आहे. या भागातील भूगर्भामध्ये उच्च प्रतीचा कोळसा असल्याची नोंद इंग्रजकाळापासून आहे. इंग्रज राजवटीत पिसगाव कोळसा खाण सुरू करण्याच्या हालचालीही झाल्या होत्या. मात्र, स्वातंत्र्यपूर्व काळात ही कोळसा खाण मागे पडली.


केळापूर तालुक्यातही चर्चा
मारेगावसोबतच केळापूर तालुक्यातदेखील शनिवारी भूकंपाची चर्चा होती. मारेगावमध्ये ज्यावेळी हे धक्के जाणवले, नेमके त्याचवेळी केळापूर परिसरातही धक्के जाणवले.


"तालुक्यातील पिसगाव, कुंभा, पांढरकवडा गावांत भूकंप झाल्याची माहिती मिळाली. गावात जाऊन नागरिकांशी चर्चा केली. कोणतीही आर्थिक वा जीवित हानी झाली नाही. जिल्हा प्रशासनाला याची माहिती दिली. केंद्र सरकारच्या भूकंप मापक यंत्रात कोणतीही नोंद नाही."
- उत्तम निलावाड, तहसीलदार, मारेगाव


"शुक्रवारी रात्री १० ते १०:१५ वाजण्याच्या सुमारास जमिनीखाली आवाज येऊन काही सेकंद घरे हलली. मी प्रत्यक्ष याचा अनुभव घेतला."
- मधुकर रिंगोले, चिंचाळा, ता. मारेगाव.

Web Title: Earthquake-like tremors felt in Maregaon taluka; Citizens rushed out of their homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.