इसापूर धरणावरील भूकंप मापक यंत्र १५ वर्षांपासून बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:47 AM2021-07-14T04:47:06+5:302021-07-14T04:47:06+5:30
महागाव : दोन दिवसांपूर्वी हिंगोली व नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू महागाव तालुक्यातील मुडाणा येथे असल्याची ...
महागाव : दोन दिवसांपूर्वी हिंगोली व नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू महागाव तालुक्यातील मुडाणा येथे असल्याची नोंद नॅशनल सेंटर फाॅर सेस्माॅलाॅजीच्या संकेतस्थळावर घेण्यात आली. मात्र, महागावलगतच्याच इसापूर धरण परिसरात असलेल्या भूकंप मापक यंत्रावर कुठलीही नोंद झाली नाही. कारण हे यंत्रच गेल्या १५ वर्षांपासून बंद आहे. भूकंपासारखी घटना घडूनही या यंत्राबाबत प्रशासन अजूनही गाफील आहे.
भूकंपाची माहिती मिळताच दक्षता म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, उमरखेड उपविभागीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परंतु उपाययोजनांसाठी आवश्यक असलेले भूकंप मापक यंत्र या परिसरात नाही. इसापूरचे यंत्र १५ वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे भूकंपापासून सुरक्षा व आगावू माहिती मिळणे अशक्य झाले आहे, अशी माहिती प्रकल्पाचे सहायक कार्यकारी अभियंता हनुमंत धुळगुंडे यांनी दिली.
२००६ मध्ये निर्जनस्थळी असलेल्या भूकंप मापक खोलीची तोडफोड होऊनही त्यातील यंत्र चोरीला गेले. राज्यभर भूकंप मापक यंत्रांची उभारणी करण्याची जबाबदारी असलेल्या उपकरणी विभाग नाशिक येथे जलसंपदा विभागाने नवीन यंत्रासाठी १९ लाख रुपये दिले. परंतु वारंवार पाठपुरावा करूनही यंत्र उभारणी झाली नाही. वरिष्ठांना अहवाल पाठवूनही दुर्लक्ष होत आहे.
भूकंपानंतर भूगर्भात बदल, हातपंपाला येतेय गरम पाणी
भूकंपाचा केंद्रबिंदू महागाव तालुक्यातील मुडाणा परिसरात होता. भूकंपानंतर या परिसरातील भूगर्भात बदल झाल्याची शक्यता आहे. कारण याच परिसरातील अंबोडा येथे माधवराव भोयर यांच्या घरी असलेल्या हातपंपाला अक्षरश: उकळते गरम पाणी येऊ लागले आहे. भूगर्भात झालेल्या बदलामुळेच हा बदल झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. उकळत्या पाण्याची वार्ता कळताच नागरिकांनी भोयर यांच्या घरी धाव घेऊन प्रत्यक्ष पाण्याचा अनुभव घेतला. हातावर पाणी घेतले असता लोकांना चटके बसले. या घटनेबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मून यांनी वरिष्ठांना अहवाल देणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.