अभयारण्यातील रस्त्यांना ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 09:35 PM2018-02-08T21:35:28+5:302018-02-08T21:36:26+5:30
आयुष्यभर वनसंपदा आणि वन्यप्राण्यांवर जीवापाड प्रेम करूनही पैनगंगा अभयारण्यातही आदिवासी बांधवांच्या नशिबी खरतड रस्तेच आहेत. अभयारण्याच्या जाचक अटींमुळे बंदीभागातील रस्त्यांची डागडुजीही केली जात नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : आयुष्यभर वनसंपदा आणि वन्यप्राण्यांवर जीवापाड प्रेम करूनही पैनगंगा अभयारण्यातही आदिवासी बांधवांच्या नशिबी खरतड रस्तेच आहेत. अभयारण्याच्या जाचक अटींमुळे बंदीभागातील रस्त्यांची डागडुजीही केली जात नाही. वर्षानुवर्षे उखडलेल्या रस्त्यांवरून पायपीट सुरू आहे.
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर विस्तीर्ण जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. या परिसरातून वाहणाऱ्या नदीमुळे अभयारण्याला पैनगंगा असे नाव देण्यात आले. शेकडो वर्षांपासून या जंगलांमध्ये आदिवासींचे वास्तव्य आहे. सुमारे ४० ते ५० गावे या अभयारण्याच्या बंदी भागात येतात. आयुष्यभर या भागातील आदिवासींनी वनसंपदा आणि वन्यजीवांवर प्रेम केले. मात्र आता त्यांच्याच जीवावर या अभयारण्याचे जाचक कायदे उठले आहे. अभयारण्याच्या जाचक कायद्यामुळे या भागातील रस्त्यांची डागडुजी केली जात नाही. वन्यप्राणी डांबरी रस्त्यावरून घसरुन जखमी होतील, त्यामुळे या भागातील कोणताही रस्ता डांबरी झाला नाही. वर्षानुवर्षे खडीकरण केलेले रस्ते या भागात आहे. परंतु खडीकरणाचेही डागडुजी करायला कुणाला वेळ नाही. बहुतांश गावांना जोडणाºया रस्त्यांवरील गिट्टी उखडली आहे. रस्त्यावरून चालण्याऐवजी बाजूच्या पाऊल वाटेवरून वाहन न्यावे लागते. उन्हाळ्यात या रस्त्यावरून वाहन जाऊ शकते. परंतु पावसाळ्यात झालेल्या चिखलाने कोणतेही वाहन जात नाही. परिणामी बंदी भागातील अनेक गावांचा संपर्क तुटतो. कुणी आजारी पडल्यास त्याला खाटेवर टाकून ढाणकीपर्यंत आणावे लागते.
रस्ते म्हणजे विकासाचे महाद्वार परंतु या भागातील रस्त्यांची झालेली अवस्था येथील नागरिकांना विकासापासून कोसोदूर नेत आहे. रस्त्यासाठी या भागातील नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली. प्रशासनाला निवेदने दिली. बारमाही रस्ते करण्याची मागणी केली. परंतु जाचक अटींचे कारण पुढे करून या भागातील रस्त्यांची साधी डागडुजीही केली जात नाही. परिणामी हा भाग आजही विकासापासून कोसोदूर आहे.