जिल्ह्याला आर्थिक फटका मात्र कोरोनाला अटकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:00 AM2020-07-02T05:00:00+5:302020-07-02T05:00:01+5:30

लॉकडाऊनच्या शंभर दिवसांचा आढावा घेतला तर संकटासोबत सहकार्याची भावना वाढल्याचे यवतमाळात दिसून आले. लोहारा एमआयडीसीतील उद्योगांवर लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला. या तीन महिन्यात जवळपास १०० कोटींचे नुकसान झाल्याचा उद्योजकांचा अंदाज आहे. तर शासकीय यंत्रणेच्या मतानुसार, एमआयडीसीतील नुकसानीचे सर्वेक्षण केल्यानंतर हा आकडा आणखी मोठा होण्याची शक्यता वर्तविली गेली.

The economic blow to the district, however, prevented the corona | जिल्ह्याला आर्थिक फटका मात्र कोरोनाला अटकाव

जिल्ह्याला आर्थिक फटका मात्र कोरोनाला अटकाव

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनला १०० दिवस पूर्ण : ठप्प पडलेली एमआयडीसी-बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर, शहरातील कोरोना रुग्णसंख्याही नियंत्रणात

अविनाश साबापुरे / रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : २२ मार्चचा जनता कर्फ्यू यवतमाळकरांनी कडकडीत यशस्वी केला. त्यानंतर सुरू झालेल्या लॉकडाऊनला गुरुवारी १०० दिवस पूर्ण होत आहेत. या शंभर दिवसात जिल्ह्यात आरोग्य रक्षण करताना आर्थिक फटका मात्र मोठा बसलेला आहे. परंतु, संकटातूनही समोरचा रस्ता शोधणे हा यवतमाळकर माणसाचा स्वभाव आहे. त्यानुसार, शंभर दिवसात झालेले नुकसान सोसूनही दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्यासाठी साऱ्यांचे प्रयत्न झपाट्याने सुरू आहेत.
लॉकडाऊनच्या शंभर दिवसांचा आढावा घेतला तर संकटासोबत सहकार्याची भावना वाढल्याचे यवतमाळात दिसून आले. लोहारा एमआयडीसीतील उद्योगांवर लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला. या तीन महिन्यात जवळपास १०० कोटींचे नुकसान झाल्याचा उद्योजकांचा अंदाज आहे. तर शासकीय यंत्रणेच्या मतानुसार, एमआयडीसीतील नुकसानीचे सर्वेक्षण केल्यानंतर हा आकडा आणखी मोठा होण्याची शक्यता वर्तविली गेली. दुसरीकडे यवतमाळ शहरातील व्यापाऱ्यांनाही दीडशे कोटींपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागले आहे.
शेती क्षेत्रात झालेल्या हानीचा तर अंदाजच न केलेला बरा. मागच्या वर्षीचा कापूस, हरभरा विकताना शेतकऱ्यांच्या हाती निराशा आली. तर लॉकडाऊनचे नियम पाळून खरेदी करताना पणन महासंघाची यंत्रणा कोलमडली. सोशल डिस्टन्स पाळताना नव्या खरिप हंगामाची सुरुवात शेतकºयांसाठी जिकरीची ठरत आहे. दूध विक्रला मर्यादित वेळेत परवानगी असल्याने दूध उत्पादक, विक्रेते यांचा धंदा मंदावला आहे. फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, सलून व्यावसायिक, काळीपिवळी चालक, ऑटोरिक्षा चालक हे छोटे व्यावसायिक तर उधारीवर जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या पुढे तर नवाच पेच आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष अध्यापन, अ‍ॅडमिशन हे प्रश्न सतावत आहेत.
लॉकडाऊननने अर्थव्यवस्था ठप्प केली, तरी कोरोना संकटात आटोक्यात ठेवण्यासाठी मात्र लॉकडाऊनचीच मोठी मदत झाली आहे. यवतमाळ शहरात सुरूवातीला आढळलेल्या रुग्णानंतर आता नवे रुग्ण बाधीत होण्याचा वेग अत्यल्प झाला आहे. ग्रामीण भागात ‘आउटकमर्स’मुळे आता रुग्ण आढळत आहे. तेथे ‘जनता कर्फ्यू’चे प्रयोग सुरू करण्यात आले आहे.
लॉकडाऊन काळात थांबलेली ‘आमदनी’ आता ती हळूहळू रूळावर येत आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत बाजारपेठ उघडी ठेवली जात असल्याने साऱ्यांच्याच अत्यावश्यक गरजा भागविल्या जात आहे. बाजारातील आर्थिक उलाढाल वाढून गेलेले छोटे रोजगारही पुन्हा पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र नुकसान झाले तरी चालेल, पण कोरोना टाळण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे, ही प्रशासनासोबत सर्वसामान्यांचीही भावना आहे.

महागाई वाढली का?
भाजीपाला : कोरोनामुळे आठवडी बाजार रद्द झाले आहेत. याशिवाय भाजी मंडईतील हर्रासही काही दिवस बंदच होता. नंतर हर्रासाकरिता मोजके तास मिळाल्याने शेतकऱ्यांना शेतमाल विकता आला नाही. यामुळे भाजीपाल्याचे दर गडगडले. व्यापाºयांनी मात्र ग्राहकांना महागात भाजीपाला विकला.

किराणा : जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत किराणा दुकाने लॉकडाऊनमध्ये उघडे होते. काही काळ जनता कर्फ्यू असल्याने सर्वच दुकाने बंद राहिली. नंतर किराणा मिळणार नाही, या भीतीने गर्दी वाढली. परिणामी व्यापाऱ्यांनी मनमानी पद्धतीने किराणा मालावर दर वाढविले. अनेक दुकानांनी दरफलक लावणेही टाळले.

कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यात प्रशासनाला सुरूवातीला चांगले यश आले होते. रुग्ण आढळलेला परिसर तातडीने सिल करणे, त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा तातडीने शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करणे, स्वॅब घेणे हे उपाय प्रभावी ठरले. कंटेन्मेंट झोलमधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला. मात्र गेल्या महिनाभरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊन शिथिल होत असताना नागरिकांकडून स्वैर वर्तन वाढत आहे.

काय सुरू?
यवतमाळ एमआयडीसीमधील २०० पैकी १२० भूखंडांवर उद्योग आहेत. लॉकडाऊन काळातही यातील ६० टक्के युनिट सुरू होते. आता उर्वरित युनिटही हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. येथील अधिकाधिक उद्योग हे ‘अ‍ॅग्रोबेस’ आहेत. रेमण्ड, जिनिंग-प्रेसिंग, दाल मिल, ऑईल मिलचे काम लॉकडाऊन काळातही सुरू राहिले.

लॉकडाऊन आणि त्यातही जीएसटीमधील किचकट गोष्टींमुळे उद्योजक अडचणीत आले. लॉकडाऊनमुळे उद्योगांचा सेल कमी झाला. लेबरची उपस्थिती कमी आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर ५० टक्के हजेरीच्या अटीवर उद्योग सुरू झाले आहेत. पण पुढचे वर्षही कठीण जाणार आहे.
- नंदकुमार सुराणा, अध्यक्ष, एमआयडीसी असोसिएशन

काय बंद?
जिल्ह्यात अद्यापही सिनेमागृह, सलून दुकाने बंदच आहेत. सलून व्यावसायिकांना केवळ कटिंगसाठी मुभा मिळाली. मात्र दाढीसाठी परवानगी नसल्याने निषेध म्हणून दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. सिनेमागृहांना तर अद्याप परवानगीच नाही. त्यामुळे कामगारांची अवस्था वाईट झाली आहे.

यवतमाळातील सिनेमागृहांचे लॉकडाऊनमुळे एक ते दीड कोटींचे नुकसान झाले आहे. एक पैशाची कमाई नसताना सिनेमागृह चालकांना कर्मचाऱ्यांचे पगार घरून द्यावे लागत आहे. आता टॉकिज सुरू करण्याची परवानगी मिळाली, तरी पुढचे दोन तीन महिने प्रेक्षक येण्याची शक्यता नाही. त्यामुळे धंद्याची अवस्था वाईट आहे.
- शैलेश सिकची, सिने प्रतिनिधी

Web Title: The economic blow to the district, however, prevented the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.