मानवीच्या खुनाला अंधश्रद्धेचीही किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 05:00 AM2021-12-29T05:00:00+5:302021-12-29T05:00:35+5:30

तालुक्यातील कुऱ्हा डुमनी येथील मानवी अविनाश चोले (३) ही बालिका २० डिसेंबरपासून बेपत्ता होती. सात दिवसांनंतर शेजारी राहणारी काकू दीपाली गोपाल चोले हिच्या घरातच मानवीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी संशयावरून दीपालीला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला आढेवेढे घेणाऱ्या दीपालीने पाेलिसी हिसका दाखविताच खुनाची कबुली दिली. मात्र खून नेमका कसा केला, हे सांगताना तिने पोलिसांना चक्रावून टाकले.

The edge of superstition to human murder | मानवीच्या खुनाला अंधश्रद्धेचीही किनार

मानवीच्या खुनाला अंधश्रद्धेचीही किनार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तीनवर्षीय मानवी नावाच्या बालिकेचा खून करणारी काकू दीपाली चोले हिला अटक करण्यात आली असून, तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. खुनाच्या कबुलीत तिने पोलिसांपुढे केलेल्या बेछूट वक्तव्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे; तर फॉरेन्सिक तज्ज्ञांना दीपालीच्या घरात आढळलेल्या वस्तूंवरून या खुनाला अंधश्रद्धेसह अनैतिक संबंधांचीही किनार असल्याचा संशय व्यक्त केला. 
तालुक्यातील कुऱ्हा डुमनी येथील मानवी अविनाश चोले (३) ही बालिका २० डिसेंबरपासून बेपत्ता होती. सात दिवसांनंतर शेजारी राहणारी काकू दीपाली गोपाल चोले हिच्या घरातच मानवीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी संशयावरून दीपालीला ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला आढेवेढे घेणाऱ्या दीपालीने पाेलिसी हिसका दाखविताच खुनाची कबुली दिली. मात्र खून नेमका कसा केला, हे सांगताना तिने पोलिसांना चक्रावून टाकले. कधी मानवीला गळा दाबून मारले, तर कधी पाण्यात बुडवून मारल्याचे ती सांगत आहे; तर दुसरीकडे, फॉरेन्सिक तज्ज्ञांनी तिच्या घरात केलेल्या तपासातून वेगळीच बाब पुढे आली आहे. फॉरेन्सिकच्या अहवालानुसार मानवीचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला. दीपालीने सात दिवस मानवीला गव्हाच्या कोठीत ठेवले होते, हे विशेष. पोलिसांनी दीपालीविरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने तिला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, मंगळवारी अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी आर्णी पोलीस ठाण्यात येऊन या प्रकरणाची सखोल चौकशी केली. 
एसपी डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात  एसडीपीओ आदित्य मिरखेलकर, ठाणेदार पितांबर जाधव, एलसीबी पीआय प्रदीप परदेशी या प्रकरणातील विविध बारकावे शोधत आहेत. पीएसआय भगवान पायघन,   एपीआय किशोर खंदार, विवेक देशमुख, मीनाक्षी सावळकर, दिनेश जाधव, मनोज चव्हाण, सतीश चौधर, अमित झेंडेकर, गोपनीय विभागाचे अरुण राठोड तपास करीत आहेत.

चक्क दारूत शिरा शिजवून केली पूजा
- सोमवारी दिवसभर फॉरेन्सिक तज्ज्ञांनी दीपाली चाेले हिच्या घरात बारीकसारीक पुरावे गोळा केले. यावेळी दीपालीने दारूमध्ये शिरा शिजवून महालक्ष्मीच्या फोटो पुढे झेंडूची फुले ठेवल्याचे आढळले. तसेच घरात चारही बाजूंनी गहू शिंपडलेले आढळून आले. त्यामुळे चिमुकल्या मानवीचा अंधश्रद्धेतून बळी घेतला गेला का, असाही संशय व्यक्त केला जात आहे.

नवरा दारूडा, म्हणे भासऱ्याचा हाेता त्रास
- मानवीचे वडील अविनाश चोले हा आपल्याला नेहमी त्रास देत होता. छेडछाड करीत होता, असा आरोप पोलीस कोठडीत असलेल्या दीपालीने केल्याचे ठाणेदार पितांबर जाधव यांनी सांगितले. तर दीपालीचा नवरा गोपाल दारूडा असल्याने दीपाली त्याच्यापासून रात्री वेगळी राहायची, अशीही माहिती दीपालीनेच पोलिसांना दिली. त्यामुळे मानवीच्या हत्या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

Web Title: The edge of superstition to human murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.