४०४ शाळांना शिक्षण विभागाची नोटीस
By admin | Published: November 2, 2014 10:40 PM2014-11-02T22:40:37+5:302014-11-02T22:40:37+5:30
निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक शाळांना शौचालय आणि मूत्रिघर सक्तीचे करण्यात आले. यानंतरही जिल्ह्यातील ४०४ शाळांमध्ये शौचालय व मूत्रिघर नसल्याची बाब
यवतमाळ : निर्मल भारत अभियानांतर्गत प्रत्येक शाळांना शौचालय आणि मूत्रिघर सक्तीचे करण्यात आले. यानंतरही जिल्ह्यातील ४०४ शाळांमध्ये शौचालय व मूत्रिघर नसल्याची बाब यू-डायसच्या अहवालातून उघड झाली. परिणामी शालेय शिक्षण विभागाने या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
जिल्ह्यात २ हजार ३०० शाळा आहेत. या शाळांमध्ये पाच लाखांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव जागृती व्हावी म्हणून निर्मल भारत अभियानात प्रयत्न केले जात आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यात प्रत्येक शाळांमध्ये शौचालय आणि मूत्रिघर असणे बंधनकारक आहे. असे असतानाही जिल्ह्यातील ८१ शाळांमध्ये मूत्रिघर तर ३२३ शाळांमध्ये शौचालय नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
या ४०४ शाळांना नोटीस बजावल्यानंतर शिक्षण विभागाने पाहणी केली. यात २४ शाळांमध्ये शौचालय आणि मूत्रीघर बांधण्यात आल्याचे निदर्शनास आले तर २४६ शाळांमध्ये किरकोळ दुरुस्तीअभावी खितपत पडलेले शौचालय व मूत्रीघर युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात आले. ३० नोव्हेंबरपर्यंत कामे पूर्ण करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला असल्याचे शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)