Education: सरकारी शाळांचे तीन लाख विद्यार्थी घटले, पुणे, मुंबईत मात्र नऊ हजार विद्यार्थी वाढले

By अविनाश साबापुरे | Published: July 24, 2023 03:41 PM2023-07-24T15:41:46+5:302023-07-24T15:42:21+5:30

Education News: गेल्या वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून तब्बल तीन लाख ७६८ विद्यार्थी घटल्याची गंभीर बाब यू-डायसच्या ताज्या अहवालातून पुढे आली आहे.

Education: Three lakh students of government schools decreased, but nine thousand students increased in Pune, Mumbai | Education: सरकारी शाळांचे तीन लाख विद्यार्थी घटले, पुणे, मुंबईत मात्र नऊ हजार विद्यार्थी वाढले

Education: सरकारी शाळांचे तीन लाख विद्यार्थी घटले, पुणे, मुंबईत मात्र नऊ हजार विद्यार्थी वाढले

googlenewsNext

- अविनाश साबापुरे
यवतमाळ - कोरोना संकटानंतर अनेक विद्यार्थ्यांनी शाळा बदलल्या. त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या शाळांवर झाला. गेल्या वर्षभरात या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून तब्बल तीन लाख ७६८ विद्यार्थी घटल्याची गंभीर बाब यू-डायसच्या ताज्या अहवालातून पुढे आली आहे.

केंद्र शासनाने दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची नोंदणी यू-डायस प्लस प्रणालीवर करून घेतली आहे. त्यानुसार, सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून ५१ लाख २३ हजार ९५५ विद्यार्थी दाखल होते. परंतु, शासनाने या आकडेवारीची तुलना २०२१-२२ या सत्रातील माहितीशी केली असता, वर्षभरात तब्बल तीन लाखांवर विद्यार्थ्यांची घट दिसून आली आहे. विद्यार्थी संख्येमध्ये दरवर्षीच थोडीबहुत घट किंवा वाढ दिसून येते. परंतु एकाच वर्षात तीन लाख विद्यार्थी घटल्याने शिक्षण विभागाची झोप उडाली आहे. महाराष्ट्रातील शाळांनी या तीन लाख विद्यार्थ्यांची माहिती यू-डायसवर भरली किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय, या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नसल्याने ते प्रणालीत नोंदविले गेले नाहीत का, असाही प्रश्न आहे. परंतु, शिक्षण क्षेत्रातील काही जाणकारांच्या मते कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना अनेक शाळांनी बोगस विद्यार्थ्यांची माहिती यू-डायसवर भरली. काही शाळांनी एकाच विद्यार्थ्याला दोन-दोन शाळेच्या पटावर दाखविण्याचाही प्रकार केला आहे. त्यामुळे यू-डायसच्या ताज्या आकडेवारीतून हे विद्यार्थी बाद झाले आहेत. तर दुसरीकडे मुंबई उपनगरमध्ये १४ हजार ८७१ आणि पुणे जिल्ह्यात ९ हजार ३२९ विद्यार्थी सरकारी शाळेत वाढलेले आहेत. तसेच राज्यातील नागपूर, चंद्रपूर, नांदेड, नाशिक, मुंबई, रायगड, पुणे, सोलापूर, सांगली या महापालिका शाळांमध्ये २१ हजार ७३८ विद्यार्थी वाढले आहेत.

खात्री करा, विद्यार्थी शोधा !
यू-डायसमध्ये तब्बल तीन लाख विद्यार्थी कमी दिसत असल्याने समग्र शिक्षाचा चालू वर्षातील निधी नेमका कसा खर्च करावा, हा पेच प्राथमिक शिक्षण परिषदेपुढे निर्माण होणार आहे. गणवेश, पुस्तके व इतर विद्यार्थी लाभाच्या निधीवर या घटीचा परिणाम होणार आहे. त्यामुळेच परिषदेने सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत अलर्ट करणारे पत्र तातडीने रवाना केले आहे. सर्व शाळांना सूचना देऊन शाळानिहाय विद्यार्थी संख्येची खात्री करा. राहिलेले विद्यार्थी शोधा, ज्या विद्यार्थ्यांची माहिती शाळांनी यू-डायसमध्ये भरलेली नसेल, ती तातडीने भरा, असे निर्देश या पत्रात देण्यात आले आहे.

 कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थी घटले?
जिल्हा : २०२२ : २०२३
नंदूरबार : १,०३,२६३ : ९८,१८८
धुळे : १,००,०६४ : ९०,९३१
जळगाव : २,०२,२२२ : १,८९,८५३
बुलडाणा : १,८५,६५३ : १,७३,७७२
अकोला : ८६,१२९ : ७८,२८१
वाशिम : ७९,२९२ : ७१,८५७
अमरावती : १,४४,२८२ : १३७,५२५
वर्धा : ५४,६९१ : ५२,५३६
नागपूर : १,०५,३२४ : १,०१,९५१
भंडारा : ७७,०७० : ७५३९३
गोंदिया ८९४४१ : ८६५१३
गडचिरोली ७२९९७ : ७१३८५
चंद्रपूर १,०९,३२५ : १,०३,९४१
यवतमाळ १,९४,६६३ : १,७७,८३५
नांदेड २,२३,६३५ : १,९८,४५५
हिंगोली १,०२,९२१ : ९२,५७७
परभणी १,३२,७८६ : १,१८,८८०
जालना १,६३,६२५ : १,४६,०६१
संभाजीनगर २,४२,६८४ : २,१७, ३९८
नाशिक ३,२७,५१० : ३,१४,५०६
ठाणे २,०२,४८८ : १,९५,५३३
मुंबई उपनगर २,९२,८२५ : ३,०७,६९६
रायगड १,०४,०३७ : १,००,४१८
पुणे ३,८४,२२० : ३,९३,५४९
अहमदनगर २,३४,२३३ : २,२३,७४२
बिड १,८१,२५२ : १,६०,२०५
लातूर १,२५,०४५ : १,०७,४१४
धाराशिव १,१६,२१३ : १,०६,८२५
सोलापूर २,२५,९५३ : २,१०,७०९
सातारा १,४०,१८२ : १,३१,१३२
रत्नागिरी ७५,१६९ : ७०,५३९
सिंधुदुर्ग ३६,७५७ : ३४,९९७
कोल्हापूर १,९७,५३८ : १,८५,४४३
सांगली १,३२,२२७ : १,२६,०४९
पालघर १,७९,००७ : १,७१,८६६

Web Title: Education: Three lakh students of government schools decreased, but nine thousand students increased in Pune, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.