जिल्ह्यात शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 10:34 PM2019-01-27T22:34:27+5:302019-01-27T22:35:38+5:30
केंद्र आणि राज्य शासनाने लोकहितासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. याचा फायदा नागरिकांना मिळत आहे. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री आवास योजना, अधिकाऱ्यांचा लोकसंवाद, स्वच्छ भारत मिशन आदी महत्वाच्या योजनांची जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे,....
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र आणि राज्य शासनाने लोकहितासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. याचा फायदा नागरिकांना मिळत आहे. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री आवास योजना, अधिकाऱ्यांचा लोकसंवाद, स्वच्छ भारत मिशन आदी महत्वाच्या योजनांची जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
येथील समता मैदानात आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात जवळपास १२०० कोटींच्या रस्त्यांची कामे करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गाकरिता एकूण ४६८.६५ हेक्टर पैकी ३८१.२४ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाकरिता १०६०.५० हेक्टर जमीन संपादित झाली आहे. १०० टक्के अनुदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू असून अनेक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सन २०१८-१९ मध्ये एकूण ४९६ कोटींची तरतूद केली आहे. बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी दहा कोटी मंजूर झाले आहे, असे ना. मदन येरावार यांनी सांगितले.
शासन आणि प्रशासनाच्या सतर्कतेमुळे यावर्षी कीटकनाशक फवारणीमुळे जिल्ह्यात एकही दुर्देवी घटना घडली नाही. हे शासन आणि प्रशासनाचे यश आहे, असे त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांची यशस्वीता ना.येरावार यांनी यावेळी मांडली. संचालन चंद्रबोधी घायवटे व ललिता जतकर यांनी केले.
विद्यार्थी व शिक्षक, खेळाडूंचा गुणगौरव, सांस्कृतिक कार्यक्रम
राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनाकरिता निवड झाल्याबद्दल येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सचा विद्यार्थी अनिकेत काकडे व घाटंजी येथील माध्यमिक कन्या शाळेची विद्यार्थिनी प्राजक्ता निकम हिला पालकमंत्र्यांच्या हस्ते इन्स्पायर अवॉर्डने गौरविण्यात आले. शिक्षक अतुल ठाकरे, आपत्ती निवारण दिनानिमित्त आयोजित वादविवाद स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकाविणारी वृषाली देशमुख, द्वितीय पुरस्कार स्वाती बाहे, तृतीय क्रमांक अजय जाधव यांच्यासह पत्रकार आनंद कसंबे, कलावंत गजानन वानखेडे, महेंद्र गुल्हाने, वंदना ठवळे, पद्माकर दुरतकर, सावित्रा वानखडे, राजू सुतार, नंदु मोहोड, बाळासाहेब पांडे, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक शेख नासीर रशिद, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता जितेंद्र सातपुते, गुणवंत खेळाडू (महिला) पूर्वा बोडलकर, गुणवंत खेळाडू (पुरुष) साहील भालेराव, गुणवंत खेडाळू (दिव्यांग) मितेश हरसुले, अमोलकचंद विधी महाविद्यालयातून एलएलबी करणारे दिव्यांग विद्यार्थी रामेश्वर चव्हाण आदींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.