जिल्ह्यात योजनांची प्रभावी अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:17 PM2018-01-27T22:17:56+5:302018-01-27T22:18:22+5:30
मागील तीन-चार वर्षात सरकारने लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. याचा फायदा नागरिकांना मिळत आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : मागील तीन-चार वर्षात सरकारने लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. याचा फायदा नागरिकांना मिळत आहे. रस्ते विकास, सिंचनाच्या योजना, कृषी विकास, आरोग्याच्या सोयीसुविधा आदी महत्वाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आदी उपस्थित होते.
ना.येरावार म्हणाले, न्युईटी धोरणांतर्गत जिल्ह्यातील ३५२ किमी लांबीच्या एकूण सात रस्त्यांसाठी एक हजार ७२ कोटी मंजूर झाले आहे. बेंबळा व अरुणावती प्रकल्पाच्या पुनर्वसित गावठाणांच्या नागरी सुविधांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने ८८.४७ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रदूषणापासून मुक्ती आणि अक्षय उर्जेचा स्त्रोत वाढावा या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजना, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी सौरउर्जा संच स्थापित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत कृषीपंपाला सौर उर्जेवर कनेक्ट करून शेतकºयाला दिवसा १२ तास वीज देण्यात येईल. पर्यटन विकासात कळंब येथील चिंतामणी देवस्थान, सहस्त्रकुंड, टिपेश्वर, संकटमोचन तलाव, खटेश्वर महाराज देवस्थान, पाथ्रडदेवी संस्थानचा समावेश आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला विविध अत्याधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी तीन कोटी निधी प्राप्त झाला आहे. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत एक हजार ५९९ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. रोजगार मेळाव्यांतर्गत एक हजार ५३९ उमेदवारांची विविध कंपन्यात निवड करण्यात आली आहे, असे ना.येरावार यांनी सांगितले.
जिल्ह्यात तीन हजार १०५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहे. जनतेच्या प्रलंबित कामांना गती यावी, ठराविक कालमर्यादेत जनतेची प्रकरणे निकाली निघावी, यासाठी जिल्हाधिकाºयांनी ‘झिरो पेंडन्सी अॅन्ड डेली डिस्पोजल’ ही मोहीम हाती घेतली आहे. अतिक्रमण करून बंद झालेले पांदण रस्ते मोकळे करण्यात येत आहे. कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेल्या रेशीम लागवडीसाठी जिल्ह्यातील शेतकरी पुढाकार घेत आहे. बांबु हे वनविभागाच्या वाहतुकीतून मुक्त करण्यात आले आहे. शेतकºयांनी धुºयावर बांबूची लागवड केली तर पिकांना संरक्षणासोबतच आर्थिक उत्पन्न देखील मिळेल. त्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड करावी, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
संचालन चंद्रबोधी घायवटे, डॉ. ललिता जतकर यांनी केले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.
विद्यार्थी, व्यापाºयांचा गौरव
आपत्ती निवारण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेत प्रथम आलेली अल्विना दुंगे, द्वितीय आकाश काळे, तृतीय क्रमांक पटकाविणारी वृषाली देशमुख, स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरी शौच्छालयाचा आग्रह धरणारी इयत्ता चौथीची श्वेता रंगारी, हागणदारीमुक्तीसाठी पुढाकार घेणारे कान्हापात्रा वाकोडे, चंद्रकला मंत्रीवार, भाऊराव गेडाम, उद्योग क्षेत्रात प्रथम पुरस्कार प्राप्त करणारे जैन इंडस्ट्रीजचे सुनील पारसमल, द्वितीय पुरस्कार मिळविणारे गजानन फर्निचर इंडस्ट्रीजचे गजानन गहुकर यांचा गौरव करण्यात आला.
क्रीडा पुरस्काराचे वितरण
जिल्हा क्रीडा संघटक संजय कोल्हे, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक अजय मिरकुटे, गुणवंत खेळाडू संजय राठोड, हेमंत भालेराव, सुप्रिया घुगरे आदींना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
जिल्ह्यातील पोलीस अधिकाºयांचा सत्कार
यावेळी राष्ट्रपती पोलीस शौर्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक संतोष इंगळे, संग्राम ताठे, उल्हास कुरकुटे यांनी पोलीस विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे त्यांचासुध्दा सत्कार करण्यात आला.