तरुणाची टॉवरवर आठ तास वीरूगिरी
By admin | Published: August 3, 2016 01:27 AM2016-08-03T01:27:42+5:302016-08-03T01:27:42+5:30
नगरपरिषद मूलभूत सुविधा पुरविण्यात असमर्थ ठरली असून निवेदन देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याने
यवतमाळ : नगरपरिषद मूलभूत सुविधा पुरविण्यात असमर्थ ठरली असून निवेदन देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याने येथील नेताजीनगरातील एका तरुणाने मंगळवारी सकाळी बीएसएनएलच्या टॉवरवर चढून वीरूगिरी केली. तब्बल आठ तासानंतर त्याला खाली उतरविण्यात यश आले.
नेताजीनगरातील चंदन सुदाम हातागडे हा तरुण मंगळवारी सकाळी ९.३० वाजता दारव्हा मार्गावरील बीएसएनएलच्या टॉवरवर चढल्याचे लक्षात आले. संभाजीनगर, वैशालीनगर, माधवनगर, अंबानगर आणि नेताजीनगरातील नागरिकांना नगर परिषद मूलभूत सुविधाही पुरवित नाही. येथील समस्या सुटत नाही तोपर्यंत आपण खाली उतरणार नाही, असे तो सांगत होता. दरम्यान तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास चंदन हातागडे सोबत मोबाईलवरून संपर्क साधला. परंतु चंदन टॉरववरच बसून होता. सायंकाळी नगरपरिषदेच्यावतीने त्याला आश्वासन देण्यात आले. ८ आॅगस्ट रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या विषयावर बैठक घेतली जाईल, असे सांगण्यात आले. त्यावरून तो सायंकाळी ५.३० वाजता खाली उतरला. पोलिसांनी चंदनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (शहर वार्ताहर)