कृषी विभागातील गैरकारभाराच्या चौकशीसाठी आठ सदस्यीय समिती
By admin | Published: August 11, 2016 12:51 AM2016-08-11T00:51:51+5:302016-08-11T00:51:51+5:30
जिल्हा परिषद कृषी विभागातील साहित्य खरेदी व अन्य गैरकारभाराच्या चौकशीसाठी आता आठ सदस्यीय समिती राहणार आहे.
जिल्हा परिषद : साहित्य खरेदीवरून स्थायी समितीची बैठक गाजली
यवतमाळ : जिल्हा परिषद कृषी विभागातील साहित्य खरेदी व अन्य गैरकारभाराच्या चौकशीसाठी आता आठ सदस्यीय समिती राहणार आहे. यापूर्वी या समितीत तीन सदस्य आणि दोन अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यात आता आणखी तीन सदस्यांची भर पडणार आहे. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या समितीमध्ये बाळासाहेब मांगुळकर, प्रवीण देशमुख, राहुल ठाकरे, अनिल नरवाडे, दिवाकर राठोड, अमन गावंडे तसेच अधिकारी विजय देशमुख आणि भुयार यांचा समावेश आहे. या बैठकीत कृषी विभागातील विविध गैरप्रकारांवर चर्चा झाली. कृषी विकास अधिकारी जगन राठोड यांचा पदभार काढण्यात यावा, अशी मागणीही लावून धरण्यात आली. या बैठकीत इतरही विषयांवर चर्चा करण्यात आली. (शहर वार्ताहर)