सोनोग्राफीसाठी आठ महिन्यांच्या गर्भवतींना महिनाभराचे वेटींग

By admin | Published: August 13, 2016 01:22 AM2016-08-13T01:22:55+5:302016-08-13T01:22:55+5:30

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सोनोग्राफी विभागाचा कारभार पूरता ढेपाळला असून, गर्भवतींना सोनोग्राफीसाठी कायम प्रतीक्षेत ठेवले जाते.

Eight months pregnant women for sonography waiting for a month | सोनोग्राफीसाठी आठ महिन्यांच्या गर्भवतींना महिनाभराचे वेटींग

सोनोग्राफीसाठी आठ महिन्यांच्या गर्भवतींना महिनाभराचे वेटींग

Next

‘मेडिकल’चा कारभार : गंभीर गर्भवतीचे करावे लागले सिटीस्कॅन
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सोनोग्राफी विभागाचा कारभार पूरता ढेपाळला असून, गर्भवतींना सोनोग्राफीसाठी कायम प्रतीक्षेत ठेवले जाते. आठ महिन्यांच्या गर्भवतींनाही महिनाभरानंतरची तारिख देण्याचा प्रताप येथे सुरू आहे. अनेकदा सोनोग्राफीपूर्वीच प्रसुती होऊन गंभीर स्थिती निर्माण होते. असाच प्रकार शुक्रवारी येथे उघडकीस आला. गंभीर अवस्थेत ‘मेडिकल’मध्ये दाखल गर्भवतीच्या सोनोग्राफीसाठी तंत्रज्ञ उपलब्ध झाला नाही. शेवटी डॉक्टरांनी सिटीस्कॅन करून उपचार सुरू केले.
रुग्णालयातील क्ष-किरण विभागाच्या नियंत्रणात सोनोग्राफीचे काम चालते. मात्र येथील अनागोंदी अनेक दिवसांपासून कायम आहे. वेळेत कधीच सोनोग्राफी होत नाही. ग्रामीण भागातून आलेल्या महिलांना आल्या पावली परत जावे लागते. येथील डॉक्टर व कर्मचारी रुग्णांशी योग्य पद्धतीने वागत नाहीत. त्यांना टोलावून लावण्याची प्रवृत्ती वाढली आहे. विभागप्रमुखाचे नियंत्रण नसल्याने या विभागात कायमची ओरड होत आहे. सर्वसामान्य रुग्णांना दाद कुठे मागावी, याची सोय राहात नाही. शुक्रवारी वॉर्ड क्र. ३ मध्ये दाखल असलेल्या रुपाली प्रशांत पुजनाके (२३) रा. बेलोरा वन या महिलेच प्रकृती अचानक बिघडली. नेमका काय प्रकार आहे, हे लक्षात आले नाही. तीन महिन्यांच्या गर्भवतीला आकस्मिकरित्या गर्भपात करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. इतकेच नव्हे तर स्त्रीरोग विभागातील डॉक्टरांनी तिला जीवीताचा धोका ओळखून आॅपरेशन थिएटरमध्ये घेतले. टेबलवर तिला अ‍ॅनेस्थेशिया देण्यात आला. मात्र तिची प्रकृती आणखीच गंभीर झाली. याच स्थिती गर्भाची स्थिती जाणून घेण्यासाठी तातडीने सोनोग्राफीची आवश्यकता होती. मात्र सोनोग्राफी कक्षात डॉक्टर व तंत्रज्ञ दोघेही उपस्थित नव्हते. या गंभीर अवस्थेत प्रत्येक क्षण महत्वाचा असताना त्या महिलेला तासभर ताटकळत राहावे लागले. शेवटी नाईलाजास्तव सिटीस्कॅन करून पुढचा उपचार सुरू करण्यात आला. ही सर्व प्रक्रिया आटोपल्यानंतर सोनोग्राफी विभागातील तंत्रज्ञ तेथे पोहोचला. अशी स्थिती येथे कायम आहे. सोनोग्राफीच्या मशनरी अचानकपणे बंद पडण्याचे प्रमाणही गेल्या काही दिवसात वाढले आहे. अनेकांची खासगीतील दुकानदारी यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे मेडिकल वर्तुळातून ऐकायला मिळत आहे. याकडे रुग्णालय प्रशासनाकडून पूर्णत: दुर्लक्ष केले जात आहे. आर्थिक देवाण-घेवाणीच्या पद्धतीमुळे नाहक ग्रामीण भागातील रुग्ण वेठीस धरले जात आहे.
एकीकडे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनस्तरावरून जननी सुरक्षा योजनेसारख्या अनेक योजना राबविल्या जात आहे. यावर कोट्यवधी रुपयांचा खर्चही होत आहे. प्रत्यक्षात मात्र रुग्णालयातील यंत्रणेवर नियंत्रण नसल्याने गर्भवती मातांचेही हाल केले जात आहे. या निष्ठुर यंत्रणेलाही वठणीवर आणण्यासाठी कठोर उपाययोजनाची आवश्यकता आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

रिक्त पदांंचा फटका
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अनेक महत्वाची पदे रिक्त आहे. विभाग प्रमुखांची पदे कागदोपत्री दिसत असली तरी आपल्या कक्षात मात्र विभाग प्रमुख कधीच दिसत नाही. तंत्रज्ञाचाही अभाव या वैद्यकीय महाविद्यालयात सुरुवातीपासून आहे. सोनोग्राफी विभागात ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांंची गर्दी असते. सकाळी ९ वाजतापासून याठिकाणी गर्दी असते. परंतु या ठिकाणी मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने गर्भवती महिलांना तारीख देऊन त्यांची बोळवण करण्याकडे कर्मचाऱ्यांचा कल असतो.

 

Web Title: Eight months pregnant women for sonography waiting for a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.