दिग्रस पोलीस ठाण्यावरील दगडफेकीत आठ जणांना शिक्षा
By Admin | Published: September 4, 2016 12:55 AM2016-09-04T00:55:07+5:302016-09-04T00:55:07+5:30
पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांच्या जमावाने येथील पोलीस ठाण्यावर दगडफेक केली होती.
१३ वर्षानंतर निकाल : कोठडी मृत्यूप्रकरण
दिग्रस : पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांच्या जमावाने येथील पोलीस ठाण्यावर दगडफेक केली होती. या प्रकरणात तब्बल १३ वर्षांनंतर शनिवारी न्यायालयाने आठ जणांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे.
सप्टेंबर २००३ मध्ये दिग्रस येथील श्वेतांबरी जैन मंदिरात झालेल्या चोरीमधील संशयित आरोपी शेख रसूल याचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता. आरोपीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यावर काही जणांचा जमाव चालून आला होता. या जमावाने दगडफेक करीत पोलीस वाहनाचे नुकसान, शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गंभीर गुन्हे दाखल झाले होते.
तब्बल १३ वर्षांपासून चालू असलेल्या या खटल्याचा निकाल दिग्रस न्यायालयाने शनिवारी ३ सप्टेंबर रोजी दिला. यामध्ये रऊफ खा अहेमद खान (वय ४३) रा. वसंतनगर पुसद, शे. जाफर शे. गफ्फार रा. मोतीनगर दिग्रस, शे. महंमद शे. आसिफ (वय ५०) रा. ताजनगर, राजिकशहा बिस्मिल्ला शहा (वय ४०) वडरपुरा, बंटी सहदेव साखरकर (वय २४) रा. संभाजीनगर, फिरोज मिन्नू नौरंगाबादे (वय ३८) गवळीपुरा दिग्रस, नियाज अहेमद अ. रहेमान (वय ४०) रा. कसाबपुरा, फिरोज खन्नू मिरावाले (वय ३५) रा. चांदनगर दिग्रस यांना आरोपी ठरवत प्रत्येकी ६ महिन्यांची शिक्षा व १ हजाराचा दंड ठोठावण्यात आला. (प्रतिनिधी)