सायबर कॅफे चालकाकडून आठ विद्यार्थ्यांची फसवणूक, नीट परीक्षेला मुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 11:38 AM2022-07-22T11:38:25+5:302022-07-22T11:40:45+5:30
विद्यार्थ्यांना बनावट हॉल तिकीट देऊन केले शैक्षणिक वर्षाचे नुकसान
यवतमाळ : शहरातील पिंपळगाव परिसरात असलेल्या कानन सायबर कॅफेचालकाने नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची फसवणूक केली. विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १७०० रुपये देऊन परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरला. सायबर कॅफेचालकाकडून त्याची रितसर पावती घेतली. इतकेच नव्हे तर परीक्षेचे हॉल तिकीटही काढण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष जेव्हा परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी केंद्रावर गेले तेथे त्यांंना अर्जच भरला नसल्याची माहिती मिळाली. परीक्षेची तयारी करून गेलेल्या विद्यार्थ्यांना पेपर न देताच परत यावे लागले.
गिरीष बाळकृष्ण गेडाम (रा. संभाजीनगर वाघापूर) याचे सुरभीनगर पिंपळगाव बायपास येथे कानन सायबर कॅफे आहे. या ठिकाणी विविध परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरले जातात. नीट परीक्षेसाठी वृषाली संतोष गिरी, नंदिनी संदीप मोकळकर यांच्यासह सात ते आठ मुलींनी ऑनलाईन अर्ज भरला. ही प्रक्रिया सायबरचालकानेच केली. त्याने मुलींना ऑनलाईन फॉर्म भरल्याची पावती व परीक्षेचे प्रवेशपत्रही काढून दिले. प्रत्यक्षात मात्र मुली नीटची परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेल्या तेव्हा त्यांचा अर्जच भरण्यात आला नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुलींना नीट परीक्षा देता आली नाही. चौकशी केली असता सायबर कॅफेचालकाने फेक परीक्षा प्रवेशपत्र बनवून त्याची कॉपी विद्यार्थ्यांना दिली. त्यातून जवळपास आठ विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली.
या सायबर कॅफे चालकाविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, अशी तक्रार विद्यार्थिनींनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात केली आहे. मात्र, चार दिवस लोटूनही पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. मुलांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळणाऱ्या सायबर चालकावर कठोर कारवाईची मागणी पालकांकडून करण्यात आली आहे. चार दिवसांपासून कुठलीही कार्यवाही न झाल्याने पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सायबर कॅफे चालकाविरोधात विद्यार्थिनींची तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीची चौकशी सुरू असून दोषी आढळल्यास गु्न्हा दाखल करून सायबर कॅफे चालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- नंदकुमार पंत, ठाणेदार, यवतमाळ शहर.