यवतमाळ जिल्ह्यात आठ हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:59 AM2020-07-22T11:59:56+5:302020-07-22T12:00:36+5:30
युरियाच्या टंचाईमुळे यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. सध्याही जिल्ह्यात आठ हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. युरिया आल्याची माहिती मिळताच शेतकरी सकाळपासूनच कृषी केंद्रांपुढे रांगा लावतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : युरियाच्या टंचाईमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. सध्याही जिल्ह्यात आठ हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. युरिया आल्याची माहिती मिळताच शेतकरी सकाळपासूनच कृषी केंद्रांपुढे रांगा लावतात.
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे सोमवारी सायंकाळी तर दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथे मंगळवारी सकाळी शेतकऱ्यांच्या या रांगा पहायला मिळाल्या. युरियाचा कमी पुरवठा आणि मागणारे अधिक यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या भीतीने फुलसावंगी येथे पोलिसांना पाचारण केले गेले. कृषी अधिकारी व पोलिसांच्या उपस्थितीत युरियाचे वाटप करण्यात आले. यापूर्वीही घाटंजी व अनेक ठिकाणी युरियासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यात चंद्रपूर, पिंपळखुटी व नांदेडवरून युरिया आणला जात आहे. लॉकडाऊनच्या भीतीने शेतकरी युरिया मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. युरियाअभावी पिकांची वाढ खुंटण्याची चिन्हे आहेत.