आठ हजार करदात्या शेतकऱ्यांचा पेन्शन परतीच्या नोटिशीला ठेंगा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 05:00 AM2021-05-29T05:00:00+5:302021-05-29T05:00:24+5:30
आयकर विभागाने तपासली असता यामध्ये आयकर भरणारे श्रीमंत व्यक्ती आणि मोठ्या पगारावरील व्यक्तींचा समावेश असल्याची बाब उघड झाली. अशा अपात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे. जिल्ह्यामध्ये दहा हजार १७० अपात्र शेतकरी आहे. ज्यांच्याकडून जमा झालेली रक्कम परत करण्याच्या सूचना तहसील प्रशासनाने दिल्या आहे. यातील एक कोटी ८७ लाख सहा हजार रुपयांची रक्कम गोळा झाली आहे. अद्याप ८८९६ शेतकऱ्यांनी ही रक्कम परत केली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान धन योजनेत श्रीमंत आणि आयकर भरणारे दहा हजार १७० शेतकरी समाविष्ट झाले आहे. अशा शेतकऱ्यांना पैसे परत करण्याची नोटीस बजावली आहे. यातील आठ हजार शेतकऱ्यांनी नोटिशीला ठेंगा दाखविला आहे.
जिल्ह्यामध्ये तीन लाख ३५ हजार ७७ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला. मिळणारा लाभ पाहून काही श्रीमंत व्यक्तींनी योजना मिळविण्यासाठी यादीमध्ये नाव टाकले आहे. ही यादी आयकर विभागाने तपासली असता यामध्ये आयकर भरणारे श्रीमंत व्यक्ती आणि मोठ्या पगारावरील व्यक्तींचा समावेश असल्याची बाब उघड झाली. अशा अपात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे. जिल्ह्यामध्ये दहा हजार १७० अपात्र शेतकरी आहे. ज्यांच्याकडून जमा झालेली रक्कम परत करण्याच्या सूचना तहसील प्रशासनाने दिल्या आहे. यातील एक कोटी ८७ लाख सहा हजार रुपयांची रक्कम गोळा झाली आहे. अद्याप ८८९६ शेतकऱ्यांनी ही रक्कम परत केली नाही.
आतापर्यंत एक कोटीची वसुली
- पंतप्रधान सन्मान धन योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन टप्प्यांत देण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी धनदांडग्यांनी आपले नाव योजनेत दाखल केले.
- आयकर विभागाने अशा धनदांडग्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. केंद्र आणि राज्य शासनाने पाठविलेल्या यादीतील दहा हजार १७० शेतकरी अपात्र आहेत.
- अशा धनदांडग्यांकडून मिळालेली रक्कम परत घेण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहे. यातील १२७४ शेतकऱ्यांनी आतापर्यंत एक कोटी ८७ लाख सहा हजार रुपये परत केले आहे.
लाभ न मिळालेल्यांचा आकडा गुलदस्त्यात
जिल्ह्यामधील तीन लाख ३५ हजार ७७ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील काही शेतकरी विविध अडचणींमुळे योजनेत सहभागी झाले नाही अशा शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला जावा म्हणून शासकीय यंत्रणेकडे वारंवार येरझाऱ्या मारल्या. यानंतरही त्यांची नावे समाविष्ट झाली नाही. जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांचा आकडा सध्या तरी गुलदस्त्यात आहे. अनेकांना आपली नावे दाखल कशी करायची, याचीच माहिती नाही. यातून अडचणी वाढल्या आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी पात्र नसतानाही योजनेत लाभ घेतला अशा शेतकऱ्यांना तहसील प्रशासनामार्फत नोटीस बजावण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी मिळालेली रक्कम परत केली आहे, तर अनेकांकडून ही रक्कम यायची आहे. याबाबत पुढे काय कारवाई करायची, याच्या सूचना प्राप्त व्हायच्या आहे. वसुलीची प्रक्रिया स्थानिक पातळीवरून होत आहे.
- ललितकुमार वऱ्हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ