‘मेडिकल’मध्ये आठ हजार महिलांची सुरक्षित प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 09:57 PM2017-10-30T21:57:54+5:302017-10-30T21:58:08+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जानेवारी ते सप्टेंबर अखेरपर्यंत तब्बल आठ हजार ३६ महिलांची सुरक्षित प्रसूती झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जानेवारी ते सप्टेंबर अखेरपर्यंत तब्बल आठ हजार ३६ महिलांची सुरक्षित प्रसूती झाली. यावरून मेडिकलच्या माता मृत्यू दरात घट झाल्याचे दिसून येते.
सप्टेंबरपर्यंत झालेल्या एकूण प्रसूतीपैकी केवळ एक हजार ५२५ महिलांची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. यात ‘इलामशिया’ या गंभीर आजाराच्या २५ महिलांची सुखरूप प्रसूती करण्यात आली. शासकीय रूग्णालयात जिल्हातूनच नव्हे, तर लगतच्या तेलंगणातील महिला प्रसूतीसाठी येतात. खासगी रूग्णालयात प्रसूतीदरम्यान प्रकृती गंभीर झालेल्या महिलांनादेखील ऐनवेळी शासकीय रूग्णालयाचाच रस्ता दाखविला जातो. येथे महिलांची धोकादाय स्थितीतून सुखरूप प्रसूती केली जाते.
शासकीय रूग्णालयात नोव्हेंबर २०१६ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत तब्बल आठ हजार ३६ महिलांची प्रसूती झाली. यात एक हजार ५२५ महिलांचे सिझर झाले. ३२८ महिलांवर गर्भ पिशवी शस्त्रक्रिया करण्यात आली. मागील तीन महिन्यात रूग्णालयात सातपेक्षा कमी हिमोग्लोबीन असलेल्या १५९ गर्भवती महिला दाखल झाल्या. यापैकी केवळ तीन महिलांचा मृत्यू झाला, तर उर्वरित सर्व महिलांची रक्त देऊन अत्यंत क्लिष्ट स्थितीत यशस्वी प्रसूती करण्यात आली.
ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणीही प्रसूती केली जाते. मात्र बहुतांश ठिकाणी आवश्यक त्या सोयी उपलब्ध नाहीत. अशावेळी संबंधित डॉक्टरांकडून जोखीम स्वीकारली जात नाही. त्यामुळे जिल्हास्थळावरील रुग्णालयात प्रसूतीसाठीची गर्दी वाढते. याही स्थितीत सुरक्षित प्रसूती केली जाते.
‘इलामशिया’ महिलांचे सुरक्षित बाळंतपण
‘इलामशिया’ हा गर्भवती महिलांना होणारा गंभीर आजार आहे. यात गरोदरपणात प्रचंड रक्तदाब वाढतो. प्रसंगी गर्भवती बेशुद्ध होतात. अथवा त्यांना सारखे झटके येतात. अशा महिलांची प्रसूती खासगी डॉक्टर आपल्या रूग्णालयात अपवादानेच करण्याची रीस्क घेतात. बहुतांश महिलांना शासकीय रूग्णालयातच पाठविले जाते. गेल्या तीन महिन्यांत हा आजार असलेल्या २९ महिला दाखल झाला. त्यांची सुरक्षित प्रसूती होऊन आता त्या ठणठणीत बºया झाल्या. मेडिकलच्या स्त्री रोग विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. श्रीकांत वºहाडे यांच्या मार्गदर्शनात सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ व कनिष्ठ वैद्यकीय अधिकाºयांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे.