निवडणुकीपूर्वीच दारव्हा भाजपात गटबाजीचे प्रदर्शन
By admin | Published: January 23, 2017 01:03 AM2017-01-23T01:03:47+5:302017-01-23T01:03:47+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जिल्हा भाजपाकडून जोरदार तयारी सुरू असताना
प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी : मेळाव्याच्या प्रसिद्धीपासून ठेवले दूर
दारव्हा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जिल्हा भाजपाकडून जोरदार तयारी सुरू असताना दारव्हा तालुक्यात मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी उफाळून आली आहे. याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने दारव्हा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्याच्या प्रसिद्धीपासून स्थानिक नेते आणि आजीमाजी पदाधिकाऱ्यांना डावलल्याचा आरोप आहे. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारसुद्धा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा वाद काय वळण घेतो याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
शुक्रवारी येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री मदन येरावार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी काही जणांनी भाजपात प्रवेश घेतला. या मेळाव्याच्या प्रसिद्धीसाठी काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महत्त्वाच्या नेत्यांची नावे टाकण्यात आली नाही. तसेच काहींच्या प्रवेशालासुद्धा प्रसिद्धी देण्यात आली नाही.
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. अजय दुबे, माजी तालुकाध्यक्ष व विद्यमान जिल्हा सचिव सुधीर अलोणे, जिल्हा सचिव आनंद दुबे, पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव ढोले, तालुका उपाध्यक्ष मनोहर भेंडे आदींसह काही प्रमुख नेत्यांची नावे न टाकता इतरांना प्रमुख उपस्थितांमध्ये स्थान दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रा. अजय दुबे केवळ उपस्थितच नव्हते तर त्यांनी मार्गदर्शनपर भाषणसुद्धा केले. यासोबतच ज्यांनी मेळाव्याचे संचालन आणि मार्गदर्शन केले ते नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत मुंगीलवार, भाजपात प्रवेश घेतलेले माजी जिल्हा परिषद सदस्य जानूसिंग राठोड यांच्या प्रवेशाचा उल्लेखही करण्यात आला नाही. या प्रकाराबाबत प्रा. अजय दुबे यांनी संताप व्यक्त केला असून याची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचे सांगितले. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडून योग्य ती कारवाई व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. (तालुका प्रतिनिधी)