आज जिल्हा बॅंक अध्यक्षाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 05:00 AM2021-01-04T05:00:00+5:302021-01-04T05:00:07+5:30
काॅंग्रेसचे खासदार बाळासाहेब धानाेरकर, माजी आमदार वामनराव कासावार यांनी टिकाराम कोंगरे यांचे नाव पुढे करत अध्यक्षपद वणी विभागात द्यावे, अशी मागणी लावून धरली, तर शिवाजीराव माेघे, मनाेहरराव नाईक यांनी मनीष पाटील यांचे नाव सुचविल्याने अध्यक्षाच्या नावावर एकमत हाेऊ शकले नाही. संजय देशमुख, प्रकाश पाटील, देवसरकर यांच्याकडून अध्यक्षपदासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत काय घडामाेडी हाेतील याबाबत अनिश्चितता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा अध्यक्ष आज, साेमवारी निवडला जाणार आहे. बॅंकेत महाविकास आघाडीला प्रचंड बहुमत मिळाले असून, काॅंग्रेसकडे सर्वाधिक संचालक आहेत. अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी यवतमाळातील रेमंडच्या विश्रामगृहावर आघाडीच्या नेत्यांची बैठक रविवारी झाली. या बैठकीत दाेन दावेदार काॅंग्रेसकडून सुचविण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन वेळेवर आघाडीत बिघाडी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काॅंग्रेसचे खासदार बाळासाहेब धानाेरकर, माजी आमदार वामनराव कासावार यांनी टिकाराम कोंगरे यांचे नाव पुढे करत अध्यक्षपद वणी विभागात द्यावे, अशी मागणी लावून धरली, तर शिवाजीराव माेघे, मनाेहरराव नाईक यांनी मनीष पाटील यांचे नाव सुचविल्याने अध्यक्षाच्या नावावर एकमत हाेऊ शकले नाही. संजय देशमुख, प्रकाश पाटील, देवसरकर यांच्याकडून अध्यक्षपदासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत काय घडामाेडी हाेतील याबाबत अनिश्चितता आहे. बैठकीतील निर्णयाबाबत महाविकास आघाडीकडून अधिकृतरीत्या ठाेस असे काही सांगण्यात आले नाही. केवळ संचालकाशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली आहेत. पक्षांना पद वाटून दिली जातील, असा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष व दाेन उपाध्यक्ष करण्यावर एकमत झाले. प्रत्येक पक्षाला एक पद दिले जाईल, असा निर्णय घेतला असून उमेदवार काेण याची घाेषणा साेमवारी सकाळी ११ वाजता करण्यात येईल. आघाडीच्या बैठकीला पालकमंत्री संजय राठाेड, खासदार बाळासाहेब धानाेरकर, आमदार डाॅ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री मनाेहरराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव माेघे, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, माजी आमदार ख्वाॅजा बेग, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार विजय खडसे, वसंत घुइखेडकर, बाळासाहेब मांगुळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड उपस्थित हाेते. जिल्हा काॅंग्रेस कमिटी कार्यालयात सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.
असा ठरला फाॅर्म्युला
महाविकास आघाडीच्या बैठकीत बँकेतील सत्ता स्थापनेचा फाॅर्म्युला निश्चित झाला आहे. अध्यक्षपद काँग्रेसला व शिखर बँकेवर सदस्यही काँग्रेसचा, शिवसेना व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उपाध्यक्ष व प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य घेतला जाणार आहे. अध्यक्षपदासाठी आघाडीच्या नेत्यांनी सर्व संचालकांना स्वतंत्र बोलावून त्यांचे मत जाणून घेतले. यावेळी मनीष पाटील, प्रकाश पाटील देवसरकर व टिकाराम कोंगरे यांनी अध्यक्षपदासाठी प्रस्ताव नेतेमंडळींपुढे सादर केला. आघाडीच्या नेत्यांची सोमवारी सकाळी ११ वाजता पुन्हा बैठक आहे.