निवडणूक फॉर्म्यूला १३ की १६ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 06:00 AM2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:04+5:30
१३ तालुका गट, तीन जिल्हा गट व पाच आरक्षण असा बँकेचा संचालकांच्या जागांबाबत जुना फॉर्म्युला आहे. परंतु अलिकडेच बँकेच्या उपविधीत बदल करून हा फॉर्म्युला तालुका गट १६, आरक्षणाच्या जागा तीन, तर जिल्हा गटाच्या दोन असा तयार करण्यात आला. या अनुषंगाने सहनिबंधक, सहकारमंत्री, उच्च न्यायालय येथे वेगवेगळ्या याचिका दाखल आहेत. कुठे अंतरिम स्थगनादेश मिळाला आहे तर कुठे सुनावणी होऊन ‘क्लोज फॉर ऑर्डर’ झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचीनिवडणूक १३ च्या फॉर्म्युल्यानुसार होणार की १६ च्या याबाबत सहकार क्षेत्रात संभ्रम आहे. खुद्द संचालक, प्रशासनालासुद्धा नेमके सांगता येणे कठीण आहे. या निर्णयासाठी आता सर्वांच्या नजरा अमरावतीचे विभागीय सहनिबंधक तथा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे लागली आहे.
१३ तालुका गट, तीन जिल्हा गट व पाच आरक्षण असा बँकेचा संचालकांच्या जागांबाबत जुना फॉर्म्युला आहे. परंतु अलिकडेच बँकेच्या उपविधीत बदल करून हा फॉर्म्युला तालुका गट १६, आरक्षणाच्या जागा तीन, तर जिल्हा गटाच्या दोन असा तयार करण्यात आला. या अनुषंगाने सहनिबंधक, सहकारमंत्री, उच्च न्यायालय येथे वेगवेगळ्या याचिका दाखल आहेत. कुठे अंतरिम स्थगनादेश मिळाला आहे तर कुठे सुनावणी होऊन ‘क्लोज फॉर ऑर्डर’ झाले आहे. परंतु या प्रकरणात अद्याप कुणीही स्पष्ट निर्णय दिलेला नाही.
२६ मार्चला बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे. १५ फेब्रुवारीला त्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र त्यानंतरही संचालक मंडळासाठी १३ चा फॉर्म्युला राहणार की १६ चा हे स्पष्ट झालेले नाही. त्याबाबत सर्वत्र संभ्रमाची स्थिती आहे. शिवाय अफवा व चुकीच्या माहितीद्वारे आणखी गैरसमजही निर्माण करून दिले जात आहे.
बँकेने अलिकडेच ठराव घेतलेल्या उपविधीला सहनिबंधकांनी मंजुरी दिल्यास १६-३-२ हा फॉर्म्युला लागू होणार आहे. मात्र हा निर्णय घेतला जातो का हे महत्वाचे ठरते. प्रकरण उच्च व सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून संचालक मंडळाची निवडणूक घेतली जात आहे. त्यामुळेच या प्रकरणात सहनिबंधक अथवा सहकार मंत्र्यांच्या स्तरावरून कोणताही निर्णय देताना फेरविचार केला जात आहे. या निर्णयावर अनेक विद्यमान संचालक व इच्छुकांचे सहकार क्षेत्रातील राजकीय भवितव्य अवलंबून आहे, एवढे निश्चित.
आज महाविकास आघाडीची बैठक
जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारी १३ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची वनमंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानी बैठक होत आहे. बँकेत महाविकास आघाडीतील कोणता पक्ष किती व कोणत्या जागा लढविणार, अध्यक्ष, उपाध्यक्ष कुणाचा असेल याबाबत आधीच ठरले असल्याचे वनमंत्र्यांनी अलिकडेच माध्यमांना सांगितले होते. गुरुवारच्या बैठकीत याबाबत ठोस काही निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.