आघाडीसह महायुतीचाही 'जुगाड' लागेना! यवतमाळ जिल्हा बॅंक अध्यक्षाची निवड लांबणीवर

By विशाल सोनटक्के | Published: September 16, 2023 05:56 PM2023-09-16T17:56:04+5:302023-09-16T17:56:51+5:30

आता २५ सप्टेंबर रोजी ठरणार कारभारी

Election of Yavatmal Zilla Bank Chairman postponed as Maha Uti joins with Aghadi in District Bank | आघाडीसह महायुतीचाही 'जुगाड' लागेना! यवतमाळ जिल्हा बॅंक अध्यक्षाची निवड लांबणीवर

आघाडीसह महायुतीचाही 'जुगाड' लागेना! यवतमाळ जिल्हा बॅंक अध्यक्षाची निवड लांबणीवर

googlenewsNext

विशाल सोनटक्के, यवतमाळ: राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशावरून जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा बॅंक अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार १८ सप्टेंबर रोजी ही निवड होणार होती. मात्र आता निवडीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून अध्यक्षपदाची निवड २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. महाविकास आघाडीसह महायुतीचाही जुगाड लागत नसल्यानेच ही निवडणूक लांबणीवर टाकल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू होताच १ ऑगस्ट रोजी राजीनामा दिल्याने आता नव्या अध्यक्षाच्या निवडीकडे लक्ष लागले आहे. २१ सदस्यीय जिल्हा बॅॅंकेत कॉंग्रेसकडे सर्वाधिक ९ संचालक आहेत. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे तीन तर शिंदे गट, शरद पवार गट आणि अजित पवार गटासह अपक्ष म्हणून प्रत्येकी दोन संचालक आहेत. तर भाजपकडे एक संचालक आहे. कॉंग्रेसकडे सर्वाधिक नऊ संचालक असून उद्धव ठाकरे गटही कॉंग्रेस सोबत राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीनेही जिल्हा बॅंक अध्यक्ष पदासाठी कंबर कसली आहे. शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप असे पाच सदस्य महायुतीकडे असून अपक्षांसह ठाकरे गटाच्या संचालकांवरही त्यांचा डोळा आहे. दोन्ही गटाकडून सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. कॉंग्रेस संचालकांनी पक्ष ठरवेल त्या उमेदवाराच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री संजय राठोड, भाजप आमदार मदन येरावार आणि राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी अध्यक्षपदाची निवड प्रतिष्ठेची केली आहे. गुप्त पद्धतीने मतदान होणार असल्याने एक संचालक निकालाचे पारडे बदलू शकतो म्हणूनच दोन्ही गटाकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. यातूनच ही निवडणूक लांबणीवर टाकल्याचे समजते.

चौकट...
असा आहे सुधारित कार्यक्रम

२५ सप्टेंबर रोजी अध्यक्षपद निवडीसाठी दुपारी १२.३० ते १ या वेळेत नामनिर्देशन पत्र देणे व स्वीकृत करण्यात येणार आहे. दुपारी १ ते १.१५ या वेळेत नामनिर्देशनपत्राची छाननी होणार आहे. त्यानंतरी १.३० वाजेपर्यंत पात्र उमेदवारांची नावे घोषित करण्यात येतील. दुपारी २ पर्यंत नामनिर्देशन पत्र माघारी घेता येईल. दुपारी २.१५ वाजता अंतिम उमेदवारांची नावे घोषित केली जाणार असून मतदानाची गरज पडल्यास दुपारी २.३० ते ३.१५ या वेळेत मतदान घेण्यात येईल. त्यानंतर मतमोजणी होऊन नूतन अध्यक्षाचे नाव जाहीर करण्यात येईल.

Web Title: Election of Yavatmal Zilla Bank Chairman postponed as Maha Uti joins with Aghadi in District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक