जिल्हा बँकेला निवडणुकीचे वेध

By admin | Published: January 5, 2016 02:46 AM2016-01-05T02:46:16+5:302016-01-05T02:46:16+5:30

जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीतील याचिकेचा अडसर दूर होण्याची चिन्हे आहे. याचिका परत

Election watch for district bank | जिल्हा बँकेला निवडणुकीचे वेध

जिल्हा बँकेला निवडणुकीचे वेध

Next

यवतमाळ : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीतील याचिकेचा अडसर दूर होण्याची चिन्हे आहे. याचिका परत घेण्यासाठी पुसदमधून संचालकाचे समूपदेशन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे सहकार प्रशासनाने ‘से’ दाखल करून याचिका निकाली काढण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे लवकरच बँकेच्या निवडणुका लागतील, अशी चिन्हे दिसत आहेत.
जिल्हा बँक संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ केव्हाच पूर्ण झाला. या मंडळाने अतिरिक्त प्रभारात तीन वर्ष आणखी काढली. आठ वर्षांपासून कायम असलेल्या या मंडळींना संचालकाच्याच एका याचिकेने आधार दिला. परंतु आता या आधाराचा अडसर दूर होण्याची शक्यता आहे. बँकेच्या निवडणुका न झाल्याने संचालकांमागे विविध स्वरूपाच्या चौकशांचा ससेमिरा लागतो आहे, तुझ्या याचिकेचा नेमका फायदा कुणाला, असा कळीचा मुद्दा उपस्थित करून या याचिकाकर्त्या संचालकाचे पुसदमध्ये ज्येष्ठ नेत्याने समूपदेशन केले. त्यामुळे हा संचालक या याचिकेबाबत मवाळ भूमिका घेण्याची, एखादवेळी याचिका मागे घेण्याची शक्यता सहकार क्षेत्रात वर्तविली जात आहे, तर दुसरीकडे अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या याचिकेवर काँक्रिट से दाखल करण्याची तयारी चालविली आहे.
बँकेच्या जिल्हा गटातून पाच संचालक निवडून दिले जाणार आहे. त्यातून दोन महिला असतील. ओबीसी, एनटी, एससी-एसटीचे प्रत्येकी एक संचालक असतील. याशिवाय बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, दुग्ध संस्था, पगारदार संस्था यातून तीन संचालक निवडून दिले जाणार आहे. या जिल्हा गटातून मनिष पाटील, वसंतराव घुईखेडकर, रवींद्र देशमुख, आर.डी. राठोड, अनिरूद्ध लोणकर ही नावे चर्चेत आहेत. पगारदार संस्थेतून राजुदास जाधव यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय वेगवेगळ्या मतदारसंघातून अनेकांनी छुपी मोर्चेबांधणी चालविली असून ऐनवेळी त्यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. बँकेचे बऱ्यापैकी हित पाहणाऱ्या प्रफुल्ल मानकर, सुरेश लोणकर, विनायकराव एकरे यांच्यासाठी सहकारात सकारात्मक वातावरण असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)

संचालकांनी लावली फिल्डींग, नवे चेहरे निवडणुकीत दिसणार
४निवडणुका लागण्याची चिन्हे पाहता संचालकांनीही फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. पुसदचे संचालक विजय चव्हाण यांनी बँकेच्या आगामी अध्यक्षपदाचे टार्गेट ठेवल्याचे सांगण्यात येते. सध्या २८ सदस्यीय असलेले बँकेचे संचालक मंडळ आता २१ चे होणार आहे. त्यामुळे विद्यमान सात संचालकांना आधीच बाद व्हावे लागणार आहे. उर्वरित संचालकांपैकी पाच ते आठ संचालक रिपिट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उमरखेडमधून प्रकाश पाटील देवसरकर, पुसदमधून विजयराव चव्हाण, दिग्रस-आर्णीमधून संजय देशमुख रिंगणात राहतील. दारव्हामधून शंकरराव राठोडांऐवजी त्यांचा कोण वारसदार पुढे येतो याकडे नजरा लागल्या आहेत. वाढत्या वयामुळे शंकरराव राठोड आपला वारसदार पुढे करण्याची शक्यता आहे. यवतमाळातून बाबासाहेब गाडे पाटील, राधेश्याम अग्रवाल, बाळासाहेब मांगुळकर यांची नावे चर्चेत आहेत. अग्रवाल यांच्या नावाला मांगुळकरांचा सक्षम पर्याय ठरू शकतो. बाभूळगावमध्ये अमन गावंडे कायम असले तरी हिम्मतराव पांडे यांचे नावही स्पर्धक म्हणून पुढे येत आहे. कळंबमध्ये प्रवीण देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. ते असल्यास बाबू पाटील वानखडे साईडला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राळेगावमध्ये प्रफुल्ल मानकर कायम आहेत. घाटंजी-पांढरकवडामध्ये प्रकाश मानकर, सुरेश लोणकर ही नावे आहेत. अण्णासाहेब पारवेकरांची एन्ट्री झाल्यास मानकर स्वत:हून साईडला होवून ओबीसीमधून नशीब आजमावू शकतात. स्थानिक बाजार समितीच्या राजकारणामुळे मानकर स्वत: पारवेकरांसाठी बँकेचा मार्ग सुकर करू शकतात. पूर्वी झरी, मारेगाव स्वतंत्र होते. आता ते एकत्र झाल्याने नरेंद्र बोदकुरवार, नरेंद्र ठाकरे, कर्मचारी नेते घनश्याम धोबे, नानासाहेब खंडाळकरांच्या परिवारातील महिला सदस्य आदी नावे चर्चेत आहेत. वणीमधून अ‍ॅड. विनायक एकरे, प्रकाश कासावार ही दोन नावे प्रामुख्याने पुढे आली आहेत.

Web Title: Election watch for district bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.