आर्थिक टंचाईतही निवडणूक

By admin | Published: September 21, 2015 02:21 AM2015-09-21T02:21:21+5:302015-09-21T02:21:21+5:30

कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचीही सोय नसलेल्या येथील खरेदी-विक्री संघाची निवडणूक घेतली जात आहे.

Elections in financial scarcity | आर्थिक टंचाईतही निवडणूक

आर्थिक टंचाईतही निवडणूक

Next

खरेदी विक्री संघ : नेर येथे काँग्रेस-राकाँ-भाजपा एकत्र, दोन लाखांचा भार
नेर : कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचीही सोय नसलेल्या येथील खरेदी-विक्री संघाची निवडणूक घेतली जात आहे. निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी उसनवार करण्याची वेळ या संस्थेवर आली आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी ही निवडणूक घेतली जात असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस-राकाँ आणि भाजप एकत्र निवडणूक लढवित आहे. शिवसेनेला टक्कर देण्यासाठी हे तीनही पक्ष एकत्र लढत आहे.
२७ सप्टेंबर रोजी १७ जागांसाठी या संस्थेची निवडणूक होत असून ३४ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी खरेदी-विक्री संघावर जवळपास दोन लाखांचा भार येऊन पडला आहे. उत्पन्नाचे स्रोत संपलेले असताना खरेदी विक्री संघ निवडणुकीसाठी पैशांची जुळवाजुळव करण्याकरिता दारोदार भटकत आहे. वास्तविक या संस्थेच्या विकासासाठी आजपर्यंत कुणीही चांगले प्रयत्न केले नाही. एक सेवानिवृत्त सचिव अवघ्या चार हजार रुपये महिन्यात खविसंचे काम सांभाळतात. एका गोडाऊन भाड्याच्या भरवशावर कर्मचाऱ्यांचे वेतन केले जाते. या स्थितीत निवडणूक बिनविरोध व्हावी ही शेतकरी सभासदांची अपेक्षा होती. मात्र यासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न झाले नाही. परिणामी खर्चाचा भार या संस्थेला सोसावा लागणार आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकत्र असलेल्या भाजप-शिवसेनेने या निवडणुकीत वेगळी चूल मांडली आहे. भाजपने काँग्रेस-राकाँशी घरोबा केला आहे. केवळ शिवसेनेला टक्कर देण्यासाठी ही खेळी खेळली गेली आहे. आतापर्यंत या संस्थेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सत्ता भोगली आहे. या दोनही पक्षाच्या संचालकांनी संस्थेची स्थिती सुधारण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाही. मात्र आता पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व वाढले आहे. या पक्षाला रोखण्यासाठी खरेदी-विक्री संघ निवडणुकीचे माध्यम वापरले जात आहे. मात्र यात एकत्र आलेल्या तीनही पक्षाला यश मिळणार की नाही, हे येणारा काळच ठरविणार आहे. मतदानानंतरच या संस्थेवर कोणाची सत्ता येते हे कळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

बँकेकडून घेणार कर्ज
निवडणूक खर्चाच्या तरतुदीसाठी खरेदी-विक्री संघ नेर अर्बनकडून आगाऊ रकमेची उचल करणार आहे. नेर अर्बनने या संस्थेचे गोडाऊन किरायाने घेतले आहे. त्यापोटी या रकमेची उचल करून निवडणुकीचा खर्च भागवावा लागणार आहे. गोडाऊनच्या भाड्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन केले जातात. आगाऊ रक्कम उचलल्याने कर्मचाऱ्यांचे वेतनही अनियमित होण्याची भीती आहे.
संस्था आपली आहे या भावनेतून यापूर्वीच्या कुठल्याही संचालकांनी विचार केलेला नाही. विकासाच्या बाबतीत या संस्थेला कधीही चांगले दिवस आले नाही. आता तर पैसा नसतानाही निवडणूक घेण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी सभासदांमध्ये नाराजीचा सूर आहे. एकीकडे टंचाई आणि दुसरीकडे निवडणुकीचा खर्च असे विरोधाभासी चित्र आहे.

निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी नेर अर्बन बँकेकडून अग्रीम रक्कम उचलण्याशिवाय पर्याय नाही.
- अरविंद देशमुख,
प्रभारी व्यवस्थापक, खविसं, नेर

या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी व काँग्रेससोबत आहोत. शिवसेनेच्या विरोधात ही निवडणूक लढवित आहोत.
- पुरुषोत्तम लाहोटी,
तालुकाध्यक्ष भाजपा, नेर

Web Title: Elections in financial scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.