इलेक्ट्रीशियनचा कोर्स कामी आणला; देव्हाऱ्याखाली गावठी दारू साठा लपविला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 04:38 PM2019-08-17T16:38:29+5:302019-08-17T16:39:44+5:30

जांब-वाघाडीतील प्रकार : पोलीस कारवाईने फुटले बिंग

Electrician's course brought in work; liquor stores in home's temple | इलेक्ट्रीशियनचा कोर्स कामी आणला; देव्हाऱ्याखाली गावठी दारू साठा लपविला

इलेक्ट्रीशियनचा कोर्स कामी आणला; देव्हाऱ्याखाली गावठी दारू साठा लपविला

Next

यवतमाळ : शहरातील मुलकी परिसरात राहणाऱ्या पदवीधर युवकाने अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्याने दारूसाठा लपविताना स्वत:चे तांत्रिक कौशल्य पणाला लावले. यामुळे जांब वाघाडी येथे सुरू असलेला दारू गुत्ता अनेक वर्षानंतर उजेडात आला. ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या धाडीत चक्क देव्हाऱ्याच्या खाली दारूचा साठा असल्याचे निष्पन्न झाले. ४० लीटर दारू एकाच जागेवरून जप्त केली. 


सचिन राजू इंगळे (३२) रा. मुलकी यवतमाळ, असे आरोपीचे नाव आहे. सचिनने कला शाखेची पदवी घेतली आहे. शिवाय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रीशियनचा कोर्सही केला आहे. घरात गाळलेल्या दारूचे जांब वाघाडी येथील घरात साठा केला जात होता. येथूनच परिसरातील गावांमध्ये दारू पुरवठा सुरू होता. एखाद्या शुद्ध पाण्याच्या प्लांट प्रमाणे अगदी मोटरपंप लावून दारू नळाद्वारे दिली जात होती. यातील सूत्रधार सचिन इंगळे हा पसार आहे. ही कारवाई ठाणेदार मनोज केदारे, फौजदार संजय शिंदे, जमादार सुरेश झोटिंग, सुनील दुबे, जयंत ब्राह्मणकर, सचिन घुगे यांनी केली.


अशी लढविली शक्कल
सचिनने जांब वाघाडी येथील घरावर ५०० लिटरची टाकी बसविली. त्या टाकीत दारू साठविली जात होती. त्यातून ही दारू घरातील देव्हाऱ्याच्या खाली असलेल्या ४० लिटरच्या ड्रममध्ये येत होती. या ड्रमलाही एक विसर्ग देऊन अंगणातील भूमिगत टाक्यांत दारू जमा होत होती. देव्हाऱ्याखालील टाकीतून दारू काढण्यासाठी कुलरचा पंप वापरला होता. बटन दाबताच बाजूला असलेल्या नळातून दारू येत होती. ठोक व चिल्लर अशा दोन्ही स्वरुपाची विक्री येथून सुरू होती. ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून या अवैध व हायटेक दारू विक्री अड्ड्याचा भंडाफोड केला. कारवाईत ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. 


खरुला येथे भूमिगत दारूसाठा 
जंगलात रात्री बेरात्री गाळलेली दारू पोलीस कारवाईपासून लपविण्यासाठी गावालगत जमिनीत गाडून ठेवली जाते. याचाही माग काढत ग्रामीण पोलिसांनी खरूला हे गाव गाठले. तेथे दोघांना अटक केली. आकाश देवीदास शेडमाके (२२), विकास देवीदास शेडमाके (२१) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर देवीदास यशवंत शेडमाके (५५), रोहन रमेश मेश्राम (२०) हे दोघे पसार झाले आहेत. या कारवाईतही एक लाख १९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला.

Web Title: Electrician's course brought in work; liquor stores in home's temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस