नेर ग्रामीणमध्ये विजेचे वांदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:25 PM2019-06-19T22:25:36+5:302019-06-19T22:25:56+5:30
थोडाही वारा सुटल्यास तालुक्याच्या ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होतो. दिवस असो वा रात्र तक्रार करूनही विद्युत कंपनीचे कर्मचारी वीज सुरळीत करण्यासाठी पोहोचत नाहीत. काही ठिकाणी तर ४८ तासपर्यंत वीज पुरवठा बंद राहतो. गर्मीमुळे जीव कासावीस होतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : थोडाही वारा सुटल्यास तालुक्याच्या ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होतो. दिवस असो वा रात्र तक्रार करूनही विद्युत कंपनीचे कर्मचारी वीज सुरळीत करण्यासाठी पोहोचत नाहीत. काही ठिकाणी तर ४८ तासपर्यंत वीज पुरवठा बंद राहतो. गर्मीमुळे जीव कासावीस होतो. कुलर-पंखे घराची शोभा वाढविणारे ठरत आहेत. दुसरीकडे पाण्याअभावी शेतातील पिके वाळत आहे. कितीही तक्रारी केल्या तरी विद्युत कंपनीचे कर्मचारीच काय, तर अधिकारीही दुर्लक्ष करत आहे. परिणामी नागरिकांचा संताप वाढत आहे.
विद्युत कंपनीचा उदासीन कारभार नवीन राहिलेला नाही. यामध्ये सुधारणा होण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाही. कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याने ग्रामीण भागात विजेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कुणीही उपलब्ध होत नाही. चार ते पाच दिवसपर्यंत वीज पुरवठा बंद राहतो. याचा सर्वाधिक फटका पाणीपुरवठ्याच्या योजनांना बसतो. पीठ गिरण्याही बंद राहात असल्याने हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचा पोटमारा होतो.
उन्हाळ्यात करावयाची कामे विद्युत कंपनीने केली नाही. झाडाच्या वाढलेल्या फांद्या तोडल्या नाही. वारा सुरू होताच या तारांच्या स्पर्शाने वीज पुरवठा गुल होतो. अनेक भागातील डीपी दुरुस्त करण्यात आलेल्या नाही. काही ठिकाणी चालचलाऊ कामे झाली. एकसोय वीज पुरवठा राहावा यासाठी काहीही उपाय केलेले नाहीत. कमी जास्त होणाऱ्या वीज प्रवाहामुळे विद्युत मोटारी जळतात. घरगुती उपकरणांनाही फटका बसतो.
शेतातील मोटारपंप जळाल्याने शेती पिकांचे सिंचन होत नाही. यात शेतमालाचे नुकसान होते. दुसरीकडे मोटारपंप दुरुस्तीचा आर्थिक फटका बसतो. अनेक गावातील पाणीपुरवठा योजना बंद राहते. आधीच पाणीटंचाई असताना नळाचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांची भर उन्हात पायपीट होते. या सर्व परिस्थितीला विद्युत कंपनीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.
खासगी वायरमनकडून कामाची जोखीम
विजेची समस्या निर्माण झाल्यास विद्युत कंपनीचे वायरमन उपलब्ध होत नाही. अशावेळी गरजवंतांना नाईलाजाने खासगी वायरमनकडून कामे करून घ्यावी लागतात. त्यांच्याकडून कामे करून घेताना मोठी जोखीम स्वीकारावी लागते. एखाद्यावेळी अपघात झाल्यास मोठे नुकसान होण्याची भीती आहे. काही ठिकाणी विद्युत कंपनीच्या वायरमनकडूनच अशा लोकांचा वापर केला जात आहे. विजेतील बिघाड स्वत: दुरुस्त न करता अकुशल वायरमनकडून कामे करून घेतली जाते. अपघात झाल्यास अशा खासगी व्यक्तीच्या कुटुंबाचे नुकसान होते. शिवाय विद्युत कंपनीवर ठपका बसतो. तरीही वायरमनविरूद्ध कारवाईची हिंमत दाखविली जात नाही.