जिल्हा बँकेने थांबविले वीज बिल स्वीकृतीचे काम
By admin | Published: November 15, 2015 01:45 AM2015-11-15T01:45:19+5:302015-11-15T01:45:19+5:30
वीज वितरण कंपनीच्या बिलाची वसुली करण्यासाठी वीज कंपनीने आपले काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिले होेते.
करार तुटला : कमिशनमध्ये कपात केल्याने निर्णय
यवतमाळ : वीज वितरण कंपनीच्या बिलाची वसुली करण्यासाठी वीज कंपनीने आपले काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिले होेते. तीन वर्षांपासून हा करार कायम होता. महिनाभरापूर्वी कंपनीने कमिशनमध्ये कपात केली. यामुळे जिल्हा बँकेने बिल स्वीकृतीचे काम थांबविले आहे.
वीज वितरण कंपनी आणि जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्यामध्ये वीज बिलाच्या स्वीकृती करार झाला होता. यामध्ये शहरी भागात प्रति लाभार्थी पाच रूपये तर ग्रामीण भागात सहा रूपयाचे कमिशन निश्चित करण्यात आले होते. वीज वितरण कंपनीने १ नोव्हेंबरपूर्वी बँकेला सूचना वजा नोटीस जारी केली. यामध्ये कमिशनमध्ये कपात करण्यात आल्याच्या सूचना होत्या. शहरी भागासाठी चार रूपये आणि ग्रामीण भागासाठी पाच रूपयांची तरतूद करण्यात आली होेती.
बिल स्वीकृतीसाठी बँकेला एक कर्मचारी पूर्णवेळ नियुुक्त करावा लागत होता. या स्थितीत बिलावर करण्यात आलेली कपात न परवडणारी होती. यामुळे बँकेने वीज वितरण कंपनीला त्यांच्या अडचणी सांगितल्या. मात्र वीज कंपनी आपल्या निर्णयावर ठाम होती. यामुळे वीज बिलाची स्वीकृती न करण्याचा निर्णय वीज कंपनीने घेतला आहे. (शहर वार्ताहर)