शेतकऱ्याच्या अपंगत्वाला वीज कंपनीच कारणीभूत; कंपनीला द्यावी लागणार आठ लाखांची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 11:56 IST2025-03-31T11:39:46+5:302025-03-31T11:56:52+5:30

Yavatmal : वीज कंपनीला यवतमाळ ग्राहक आयोगाचा दणका

Electricity company responsible for farmer's disability; company will have to pay compensation of eight lakhs | शेतकऱ्याच्या अपंगत्वाला वीज कंपनीच कारणीभूत; कंपनीला द्यावी लागणार आठ लाखांची भरपाई

Electricity company responsible for farmer's disability; company will have to pay compensation of eight lakhs

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
शेतातील वीज खांबात संचारलेल्या प्रवाहामुळे जखमी झालेल्या शेतकऱ्यास ८५ टक्के अपंगत्व आले. वीज कंपनीचा दुर्लक्षितपणाच शेतकऱ्याच्या अपघाताला कारणीभूत असल्याचे सिद्ध झाल्याने ग्राहक आयोगाने कंपनीला आठ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे.


उत्तरवाढोणा (ता. नेर) येथील राजू केशवराव नरोटे हे शेतात डवरणी करत असताना हा अपघात झाला. वीज खांबातील प्रवाहामुळे त्यांचा डावा हात कोपरापासून कापावा लागला, तसेच एक पाय भाजला गेला. त्यांनी वीज कंपनीकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर त्यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली. आयोगाने विद्युत कंपनीचा हलगर्जीपणा सिद्ध होत असल्याचे मान्य करून भरपाईचा देण्याचा आदेश दिला. 


वीज निरीक्षकाचा अहवाल धुडकावला

  • घटनेनंतर वीज निरीक्षकाने आपला अहवाल सादर केला होता. त्यामध्ये विद्युतीय कारणामुळे अपघात झाल्याचे स्पष्टपणे नमूद करताना शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी, असे म्हटले होते. मात्र, वीज कंपनीने हा अहवाल धुडकावत भरपाई नाकारली होती.
  • विशेष म्हणजे, आयोगाने निकाल देताना विद्युत निरीक्षकांचा अभिप्राय महत्त्वपूर्ण ठरला. वीज कंपनीच्या यंत्रणेतील व्यक्तीने दिलेल्या अहवालावरही या प्रकरणात अविश्वास दाखविण्यात आला होता.


ग्राहक आयोगात धाव
वीज कंपनीकडून भरपाई मिळण्याची कुठलीही शक्यता दिसत नसल्याने राजू नरोटे यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली. आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे, सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली. राजू नरोटे यांची बाजू अॅड. प्रकाश शेळके यांनी मांडली. शेतातील वीज खांबाची देखभाल, दुरुस्ती योग्यरीत्या केली नसल्याने अपघात होऊन नरोटे यांना अपंगत्व आल्याचे आयोगाने नमूद करत त्यांच्या बाजूने निकाल दिला.


व्याजासह रक्कम द्यावी
वीज कंपनीने राजू नरोटे यांना आठ लाख रुपये आठ टक्के व्याजासह द्यावे, असे आयोगाने आदेशात नमूद केले आहे. कायम अपंगत्व आल्याने आणि पुढील आयुष्यात येणाऱ्या उपचार खर्चाकरिता सर्वसमावेश म्हणून ही रक्कम देण्यात यावी, असे आयोगाने म्हटले आहे.

Web Title: Electricity company responsible for farmer's disability; company will have to pay compensation of eight lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.