वीज पडून शेकडो पोपट ठार
By admin | Published: September 17, 2015 02:59 AM2015-09-17T02:59:34+5:302015-09-17T02:59:34+5:30
अचानक आलेल्या वादळासोबत एक वीज झाडावर कोसळ्याने शेकडो पोपटांचा बळी गेल्याची घटना शहरानजीक मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
मुकुटबन येथील घटना : अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे झाली निकामी
मुकुटबन : अचानक आलेल्या वादळासोबत एक वीज झाडावर कोसळ्याने शेकडो पोपटांचा बळी गेल्याची घटना शहरानजीक मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. बुधवारी सकाळी मृत पोपटांचा सडा पाहून प्रत्येक जण हळहळत होता.
मंगळवारी रात्री विजांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. सोबतच जोरदार पावसाला सुरूवात झाली. शहराच्या मध्यभागी श्रीसंत नागन्ना महाराज यांचा मठ आहे. या मठाच्या बाजूला एक भले मोठे पिंपळाचे झाड आहे. या झाडावर दररोज सायंकाळी अनेक पक्षी बसतात. त्यांची किलबिलाट दररोज नागरिकांच्या कानी पडते. सायंकाळी तर पक्ष्यांचा गोंगाट सुरू असतो. मंगळवारी जोराची हवा असल्याने इतर पक्ष दुसरीकडे निघून गेले असावे. मात्र पोपटांचा एक थवा त्या पिंपळ वृक्षावर बसला होता.
अशातच त्यावेळी वादळ-वारा व मेघगर्जनेसह पाऊस कोसळू लागला. त्यातच विजांचा कडकडाट सुरूच होता. त्यातीलच लखलखणारी एक वीज त्या पिंपळ वृक्षावर कोसळली. पिंपळावर बसलेल्या ‘राघू-मैने’सह इतरही पोपटांना त्याचा जोरदार झटका बसला अन् क्षणार्धात झाडावरील सर्व पोपट पटापट खाली कोसळून मृत्युमुखी पडले. तडफडत त्यांनी आपले प्राण त्यागले. हे दृश्य बघून अनेक नागरिकांचे डोळेही पाणावले होते.
झाडावर वीज कोसळताच शेजारील घरांमधील कुलर, दूरचित्रवाणी संच, फ्रिजलासुद्धा हानी पोहोचली. अनेक विद्युत उपकरणे निकामी झाले. मात्र सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने बुधवारी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सर्व मृत पोपटांना जमा करून करून त्यांना दफन करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)