वीज कर्मचाऱ्यास धक्काबुक्की; एकास सक्त मजुरीची शिक्षा

By विशाल सोनटक्के | Published: March 17, 2023 06:10 PM2023-03-17T18:10:10+5:302023-03-17T18:10:34+5:30

न्यायालयाचा निकाल : २०१६ मधील राळेगाव येथील प्रकरण 

Electricity worker punched; One was sentenced to hard labour | वीज कर्मचाऱ्यास धक्काबुक्की; एकास सक्त मजुरीची शिक्षा

वीज कर्मचाऱ्यास धक्काबुक्की; एकास सक्त मजुरीची शिक्षा

googlenewsNext

यवतमाळ : घरगुती विद्युत बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेल्या पथकाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी राळेगाव येथील एकास सहा महिने सक्त मजुरीच्या कारावासाची शिक्षा येथील तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ यांनी सुनावली. 

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ राळेगाव विभागाचे कनिष्ठ तंत्रज्ञ प्रकाश गोविंद भुलगावकर हे पथकासह घरगुती विद्युत बिलाची थकबाकी वसुली करण्यासाठी राळेगाव शहरातील ओमनगर येथे गेले होते. यावेळी त्रिपदवार यांचे वीज मीटर काढत असताना शेजारी राहणारा प्रेमानंद शेषराव आटे हा तेथे आला. विद्युत मीटर काढायचे नाही, तसेच थकबाकीही द्यायची नाही असे म्हणून त्याने कनिष्ठ तंत्रज्ञ भूलगावकर यांची कॉलर पकडून दूर ढकलले.

यावेळी पथकातील दुसरा सहकारी आटे यास अडविण्यासाठी गेला असता त्याच्या सोबतही धक्काबुक्की केली. आटे याने घरात जाऊन स्वत:ला जखमी करून घेतले व तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवेन अशी पथकातील सदस्यांना धमकी दिली. २२ मार्च २०१६ रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी राळेगाव पोलिस ठाण्यात कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपास अधिकारी सहायक पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण चौके यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 

न्यायालयाने सहा साक्षीदार तपासले

हे प्रकरण तदर्थ जिल्हा न्यायाधीश - २ श्रीमती एस. आर. शर्मा यांच्यासमोर चालले. न्यायालयाने सहा साक्षीदार तपासले. सरकारी वकील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी प्रेमानंद आटे यास भादंविचे कलम ३५३ अंतर्गत सहा महिने सक्त मजुरीच्या कारावासाची शिक्षा ठोठावली, तर भादंविचे कलम ३३२ अंतर्गत सहा महिने सक्त कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील अनिलकुमार एस. वर्मा यांनी काम पाहिले. त्यांना राळेगाव ठाण्याचे पैरवी अधिकारी राजेश भाऊराव पानसे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Electricity worker punched; One was sentenced to hard labour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.