देशभरातील वीज कर्मचारी आज काळा दिवस पाळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 04:52 PM2020-05-31T16:52:14+5:302020-05-31T16:52:26+5:30

वीज बिल कायदा आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे धोरण याचा महाराष्ट्र व देशभरातील ऊर्जा क्षेत्रातील कर्मचा-यांनी तीव्र विरोध केला आहे.

Electricity workers across the country will observe Black Day today | देशभरातील वीज कर्मचारी आज काळा दिवस पाळणार

देशभरातील वीज कर्मचारी आज काळा दिवस पाळणार

Next

यवतमाळ : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वीज बिल कायदा आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे धोरण याचा महाराष्ट्र व देशभरातील ऊर्जा क्षेत्रातील कर्मचा-यांनी तीव्र विरोध केला आहे. हा विरोध सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी अभियंते आणि कर्मचारी १ जून रोजी काळादिवस पाळत काळीफित लावून काम करणार आहे.

शिवाय नॉन रेड झोन जिल्ह्यात निषेध सभाही घेतल्या जाणार आहे. केंद्र सरकारने १७ एप्रिलला वीज बिल कायदा आणि खासगीकरणाचे धोरण जाहीर केले. तेव्हापासूनच कर्मचा-यांमध्ये असंतोष खदखदत आहे. या धोरणामुळे देशभरातील शेतकरी, औद्योगिक ग्राहक व सर्वसामान्य गरीब नागरिकांना संकटाचा सामना करावा लागणार आहे. राज्य सरकारच्या अधिकाराला कात्री लागणार आहे. गरीब शेतक-यांना वीज दरात मिळणा-या सर्व सबसिडी बंद होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग व स्टेट लोड डिस्पॅच सेंटरचे सर्व अधिकारही केंद्र सरकारकडे जाणार आहे. हे धोरण फक्त खासगी कंपन्यांना पोषक आहे.
 
कोरोना व लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी आंदोलन करू शकणार नाही, असा विचार करून सरकारने हे धोरण घाईघाईने आणले आहे. केंद्रशासित प्रदेशातील वीज वितरण कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे आदेशसुद्धा दिल्याचे समजते. वास्तविक या धोरणाबद्दल तक्रारी, हरकती दाखल करण्यासाठी ५ जूनपर्यंत मुदत आहे. अनेक राज्य सरकारतर्फे विरोध असूनसुद्धा केंद्र सरकार या धोरणाबाबत घाई करीत आहे. त्यामुळे सर्व ऊर्जा क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आणि अभियंत्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. आंदोलनाची पहिली पायरी म्हणून १ जून रोजी काळ्याफिती लावून काम केले जाईल. केंद्राच्या या धोरणाला राज्याने विरोध करावा, असे आवाहन करणारे पत्र सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांना पाठविले आहे. सर्व खासदार आणि पक्ष प्रमुखांनाही आवाहन केले जाणार आहे. या आंदोलनात सर्व सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी सहभागी होण्याचे आवाहन सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे सरचिटणीस संजय ठाकूर, जिल्हा सहसचिव प्रकाश कोळसे यांनी केले आहे.

Web Title: Electricity workers across the country will observe Black Day today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.