मेंढपाळांवरील अत्याचाराविरुद्ध एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 05:00 AM2020-07-18T05:00:00+5:302020-07-18T05:00:13+5:30
अहमदनगर जिल्ह्यात मेंढपाळ व महिलांना मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले. धुळे जिल्ह्यात गावगुंडांनी घरात शिरून मेंढपाळांना मारहाण केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अयोध्या मेहत्रे यांची शेताच्या वादातून जाळून हत्या करण्यात आली. चिंतामण ठेल्लरी यांना बेदम मारहाण केली. धुळे जिल्ह्यात गावगुंडांनी सात मेंढपाळांना मारहाण करून त्यांच्या ३५ मेंढ्या मारून टाकल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : मेंढपाळांवर होत असलेल्या अत्याचाराला प्रतिबंध घालण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
अहमदनगर जिल्ह्यात मेंढपाळ व महिलांना मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले. धुळे जिल्ह्यात गावगुंडांनी घरात शिरून मेंढपाळांना मारहाण केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अयोध्या मेहत्रे यांची शेताच्या वादातून जाळून हत्या करण्यात आली. चिंतामण ठेल्लरी यांना बेदम मारहाण केली. धुळे जिल्ह्यात गावगुंडांनी सात मेंढपाळांना मारहाण करून त्यांच्या ३५ मेंढ्या मारून टाकल्या. औरंगाबाद जिल्ह्यात महिलेवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. कोल्हार येथे संपूर्ण धनगर वस्ती जाळण्यात आली. जळगाव जिल्ह्यात १२० मेंढ्या पळवून नेल्या. विवाहितेवर अत्याचार केला. अमळनेर तालुक्यात मेंढपाळास हातपाय तोडून डोळे काढले. एका ट्रकचालकाने २५० मेंढ्या चिरडून टाकल्या. पुणे व सोलापूर जिल्ह्यात समाजबांधवांवर प्राणघातक हल्ला झाला. अशा अनेक घटना राज्यात घडल्या आहे. अन्याय आणि हल्ले सुरूच आहे. अशा गावगुंडांना प्रतिबंध घालण्यासाठी मोक्का, मिसा, पोटा आदी कायद्यांची तरतूद करावी अशी मागणी केली. यावेळी मल्हार सेनेचे जिल्हा प्रमुख यादव गावंडे, तानाजी घुमनर, डॉ.राजाभाऊ खांदवे, रवीशंकर पावडे, भास्कर गोरे, कुणाल परांडे, देवाशीष परांडे, दशरथ महानर उपस्थित होते.
चराई पासेस द्याव्यात
चराईसाठी वने आरक्षित करून चराई पासेस द्याव्या, मेंढपाळांवरील गंभीर गुन्ह्याची नोंद घेऊन त्यांना गावगुंड व जंगली श्वापदापासून रक्षणासाठी बंदुकीचा परवाना मिळावा, अशी मागणी केली. तसेच खोटे गुन्हे मागे घ्यावे, हल्लेखोरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, शेळी-मेंढी पालन व्यवसायासाठी कायमस्वरूपी २५ लाखांपर्यंत अनुदान द्यावे आदी मागण्या केल्या.