राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी, अधिकारी संघटनेचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:09 AM2021-07-13T04:09:35+5:302021-07-13T04:09:35+5:30
यवतमाळ : राष्ट्रीय ओबीसी अधिकारी, कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी एल्गार पुकारला. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. ...
यवतमाळ : राष्ट्रीय ओबीसी अधिकारी, कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी एल्गार पुकारला. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
पूर्वी इतर मागासवर्गीय तथा अन्य विद्यार्थी, कर्मचारी तथा लाभार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी अमरावती येथे अर्ज करावा लागायचा. ही बाब खर्चिक होती. कालांतराने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी यवतमाळ येथे सोय करण्यात आली. मात्र, अद्याप ओबीसी विद्यार्थी, कर्मचारी व लाभार्थी यांना विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही. ओबीसी कर्मचारी, अधिकारी महासंघाने ही माहिती निवासी जिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांना लक्षात आणून दिली.
जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत प्राप्त होत नसल्यामुळे ओबीसी विद्यार्थी, कर्मचारी व लाभार्थ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. सध्या जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र हे ऑनलाईन व ई मेलद्वारेच प्रदान होत आहे. त्यामुळे ज्यांच्याजवळ अँड्राॅइड मोबाईल नाही, अशांची गैरसोय होते. तसेच कोरोनामुळे आर्थिक खालावलेल्या स्थितीमुळे ओबीसी विद्यार्थ्यांची प्रि मॅट्रिक शिष्यवृत्ती त्वरित मिळाल्यास शिक्षणासाठी उपयोगी पडेल. या दृष्टीने संबंधित विभागाकडून ओबीसी विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा व्हावी, या दृष्टीने पत्रव्यवहार करुन ओबीसी विद्यार्थ्यांना त्यांची शिष्यवृत्ती मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत लोळगे, नरेंद्र भांडारकर, सागर काळे, शशिकांत फेंडर, अनिल जयसिंगपुरे, भाऊ कपाट, रवी नागरीकर, सारंग भटूरकर आदी उपस्थित होते.