मध्यरात्री इमर्जन्सी लोडशेडिंग; गर्मीने नागरिक उकडले, वीज कार्यालय फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 05:00 PM2022-04-08T17:00:01+5:302022-04-08T17:57:45+5:30
मांगलादेवी ( यवतमाळ ) : इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली वेळाेवेळी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. मांगलादेवी परिसरात रात्री ११ ते ...
मांगलादेवी (यवतमाळ) : इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली वेळाेवेळी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. मांगलादेवी परिसरात रात्री ११ ते १.३० पर्यंत वीज बंद ठेवली जाते. यामुळे हैराण झालेल्या नागरिकांचा संयम सुटला. त्यांनी गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुुमारास विद्युत कंपनीच्या येथील कार्यालयावर धडक दिली. या कार्यालयाचा दरवाजा आणि खिडकीची तावदाने तोडून आपला रोष व्यक्त केला.
दिवसभर काम करून थकलेला शेतकरी, शेतमजूर रात्री निवांत झोप मिळेल, या आशेवर असताना वीज गुल होते. लहान बालके, आजारी व्यक्ती तसेच वृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्याची वीज कपातीची वेळ चुकीची आहे. सायंकाळी ५ ते ७ आणि सकाळी ५ ते ९ या वेळात वीज कपात करावी, असे सुचविले आहे.
मध्यरात्री वीज कपात होत असल्याने त्रास होण्यासोबतच चोरीच्या घटनात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. दरम्यान, इमर्जन्सी लोडशेडिंग वरिष्ठांच्या आदेशानुसार केले जाते, तेव्हा जनतेची मागणी वरिष्ठांपर्यंत पोहोचविली जाईल, असे विद्युत कंपनीच्या येथील कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता मोईज खान पठाण यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांचा काम बंद इशारा
इमर्जन्सी लोडशेडिंगमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र जमून विद्युत कार्यालयाची तोडफोड केल्याने कर्मचारी भयभीत झाले आहे. पोलीस संरक्षण मिळेपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तसे पत्र त्यांनी विद्युत कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले.