मोहद्यात दारूविक्रीतून राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:49 PM2018-06-26T23:49:09+5:302018-06-26T23:50:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोहदा या गावात अवैध दारू विक्रीच्या विषयावरून मंगळवारी सकाळी चांगलाच राडा झाला. अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या महिलेने गावातील एका इसमाला शिविगाळ करून मारहाण केल्यानंतर गावकरी संतापले. एसडीपीओ विजय लगारे यांना सरपंचांनी दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर एसडीपीओंचे पथक व शिरपूर पोलीस तात्काळ मोेहद्यात दाखल झाले. दारू अड्डा उद्ध्वस्त करून महिलेला अटक केल्यानंतर गावकरी शांत झाले.
शुद्धमती शंकर लिंगरवार असे दारू विक्रेत्या महिलेचे नाव आहे. स्त्री असल्याचा फायदा घेत या महिलेने गेल्या अनेक दिवसांपासून मोहदा गावात दहशत पसरविल्याचे गावकरी सांगतात. दारू विक्रीला विरोध करणाऱ्यावर खोटे आरोप करून ही महिला त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याने गावकरी कायम दहशतीत असतात. या परिसरात गिट्टी क्रेशरची संख्या मोठी असून त्यावर काम करणाऱ्या मजुरांना ही महिला दारू पुरविते. यामुळे गाव त्रस्त झाले आहेत. शिरपूर पोलिसांनी यापूर्वी तिच्याविरोधात अनेकदा कारवाया केल्या. परंतु कारवाईला न जुमानता ही महिला खुलेआम दारूविक्री करीत आहे.
मंगळवारी सकाळी गावातील किशोर कुचनकार हा एका पानटपरीवर उभा असताना शुद्धमतीने त्याला अकारण शिविगाळ करीत मारहाण केली. या प्रकाराने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी लगेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. लगारे यांनी लगेच आपले पथक मोहद्याकडे रवाना केले. तसेच शिरपूरचे ठाणेदार दीपक पवार यांनाही याबाबत सूचना केली. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन शुद्धमतीला अटक करण्यात आली. त्यानंतर तिच्या घराचा परिसराची ‘सर्चींग’ केली, तेव्हा बाजुलाच असलेल्या एका मातीच्या ढिगाऱ्यात दारूच्या शिशा लपवून ठेवल्या असल्याची बाब उघडकीस आली. पोलिसांनी या कारवाईत सहा हजार ५०० रुपयांची देशी दारू जप्त केली. कारवाईनंतर पोलीस निरीक्षक दीपक पवार यांनी गावकऱ्यांसोबत चर्चा केली. यापुढे दारू विकली जाऊ देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर गावकरी शांत झाले. याप्रकरणी आरोपी शुद्धमतीविरुद्ध भादंवि ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एसडीपीओंच्या पथकातील आशिष टेकाडे, रवी ईसनकर, संतोष कालवेलवार, प्रिया डांगे यांनी सहभाग घेतला.