दुरूस्ती कामे सोडून कर्मचारी वसुलीवर

By admin | Published: June 27, 2017 01:28 AM2017-06-27T01:28:54+5:302017-06-27T01:28:54+5:30

गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच वणीसह मारेगाव, झरी व पांढरकवडा या चार तालुक्यातील नागरिक विजेच्या समस्येनी हैराण आहेत.

Employee receipts without repairs | दुरूस्ती कामे सोडून कर्मचारी वसुलीवर

दुरूस्ती कामे सोडून कर्मचारी वसुलीवर

Next

मान्सूनपूर्व कामांना तिलांजली : वीज समस्यांनी चार तालुक्यातील नागरिक हैराण
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच वणीसह मारेगाव, झरी व पांढरकवडा या चार तालुक्यातील नागरिक विजेच्या समस्येनी हैराण आहेत. वरिष्ठांकडून मिळालेल्या कारवाईच्या धसक्याने वीज कर्मचाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी वसुलीवर लक्ष केंद्रीत केल्याने मॉन्सूनपूर्व कामेच करण्यात न आल्याने पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. अजुनही ही समस्या सोडविण्यात वीज वितरण कंपनीला यश आले नाही.
साधारणत: मे महिन्यात वीज वितरण कंपनीकडून पावसाळापूर्वीची कामे केली जातात. वीज वितरणासाठी अडथळा निर्माण करणाऱ्या त्रुटी दुरूस्त केल्या जातात. त्यात वीज तारांना स्पर्श करणारी झाडे तोडणे, तुटलेल्या तारांना बदलविणे, वाकलेले पोल बदलविणे आदी देखभाल दुरूस्तीची कामे केली जातात. ३१ मार्चपूर्वी वीज बिल वसुलीची कामे पूर्ण केली जातात. मात्र यंदा वीज वितरण कंपनीने आपल्या धोरणात बदल केला. ज्या काळात देखभाल दुरूस्तीची कामे करावयाची होती, त्या काळात वीज कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी पिटाळण्यात आले. परिणामी ८५ टक्के वसुली झाली. वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा या चार तालुक्यांतील ग्राहकांकडे वीज वितरण कंपनीचे आठ करोड ३२ लाख रुपये थकीत होते. सारेच वीज कर्मचारी वसुलीच्या मागे लागल्याने सात करोड २५ लाख रुपये वसुल करण्यात वीज वितरण कंपनीला यश आले.
तत्पूर्वी वीज वितरण कंपनीतील एका बड्या अधिकाऱ्याने ‘वसुली करून आणा अन्यथा कारवाईला सामोरे जा’ अशी धमकीच कर्मचाऱ्यांना दिली होती, असे सांगितले जाते. कारवाईच्या भितीने कर्मचारीही वसुलीच्या मागे लागलेत. यामुळे वीज ग्राहकांकडे थकीत असलेली रक्कम वसुल झाली खरी पण विजेची समस्या मात्र सुटली नाही. वसुलीच्या कामामुळे देखभाल दुरूस्तीच्या कामांना वेळच न मिळाल्याने यावर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच वीज ग्राहकांना विजेच्या लपंडावाशी सामना करावा लागत आहे. थोडी जरी हवा आली तरी वीज गुल होते. वीज पुरवठा पुन्हा कधी सुरू होईल, याचाही नेम नसतो. ग्रामीण भागात ही समस्या वाढली आहे.
यंदा पाऊस लवकर येईल, असे भाकीत हवामान खात्याने व्यक्त केले होते. मात्र जूनचा शेवटचा आठवडा सुरू झाल्यानंतरही समाधानकारक पाऊस न पडल्याने नागरिक उकाड्याशी सामना करीत होते. त्यात वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या मनस्तापात भर पडत आहे. केवळ ग्रामीण भागच नाही तर शहरी भागातही हीच समस्या आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहरातील नागरिकही त्रस्त झाले आहेत. आता वीज कर्मचाऱ्यांना उसंत मिळाल्याने देखभाल दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र पावसात ही कामे करताना वीज कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Employee receipts without repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.