निवडणुकीच्या तोंडावर कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:00 AM2019-01-09T00:00:22+5:302019-01-09T00:01:02+5:30

निवडणुका तोंडावर आल्याचे दिसताच राजकीय पक्षांनी आपआपली समीकरणे आखणे सुरू केलेले आहे. तर दुसरीकडे विविध मागण्या मान्य करून घेण्याची हीच अखेरची संधी असल्याचे पाहून बहुतांश कर्मचारी संघटनांनी संप आणि आंदोलनांचे हत्यार परजून घेतले आहे.

Employee strikes in the face of elections | निवडणुकीच्या तोंडावर कर्मचारी संपावर

निवडणुकीच्या तोंडावर कर्मचारी संपावर

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वसामान्यांचे व्यवहार खोळंबले : राज्य कर्मचारी, बँक, डाक, वीज कर्मचाऱ्यांचा सरकारविरुद्ध एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निवडणुका तोंडावर आल्याचे दिसताच राजकीय पक्षांनी आपआपली समीकरणे आखणे सुरू केलेले आहे. तर दुसरीकडे विविध मागण्या मान्य करून घेण्याची हीच अखेरची संधी असल्याचे पाहून बहुतांश कर्मचारी संघटनांनी संप आणि आंदोलनांचे हत्यार परजून घेतले आहे. वंचित कर्मचाऱ्यांचा हा उद्रेक मंगळवारी शहरात पहायला मिळाला. मंगळवारी अंगणवाडीताई, दूरसंचार विभागाचे कर्मचारी, औषध विक्रेते, डाक विभागाचे कर्मचारी यांनी संप पुकारला. महसूल कर्मचाऱ्यांनीही सरकारचा निषेध केला. त्यातच वीज कर्मचारी आणि बँक कर्मचाऱ्यांच्या संपाने सर्वसामान्यांचा गोंधळ वाढविला.
सर्वच संघटनांनी एकत्र येऊन ८ व ९ जानेवारीला देशव्यापी संपाची हाक दिली होती. महसूल कर्मचाºयांनी सहभाग घेत सरकारच्या धोरणाचा निषेध केला. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. जुनी पेंशन योजना लागू करण्याची मागणी केली. कंत्राटी कामगारांना कायम करा, किमान वेतन १८ हजार करा, सर्वांना बोनस लागू करा, रिक्त पदे भरा आदी मागण्या महसूल कर्मचाºयांनी रेटल्या. या आंदोलनाचे नेतृत्व राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे कार्यकारी सरचिटणीस नंदू बुटे यांनी केले. चतुर्थ श्रेणीचे राजू मानकर, नर्सेस फेडरेशनच्या शोभा खडसे, ठाकरे, कोतवाल संघटनेचे दोनोडे, पेंशन हक्क समितीचे प्रफुल्ल पुंडकर, आर.एस. शेख, मंगेश वैद्य, विजय साबापुरे उपस्थित होते.
डाक सेवा ठप्प
नॅशनल फेडरेशन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज युनियन, फेडरेशन आॅफ नॅशनल पोस्टल आर्गनायझेशनच्या नेतृत्वात डाक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप केला आहे. जुनी पेंशन, कमलेशचंद्र कमिटीचा अहवाल, कंत्राटीकरण बंद करा, पाच दिवसांचा आठवडा आदी त्यांच्या मागण्या आहेत. आंदोलनाचे नेतृत्व विभागीय सचिव सुनील रोहणकर, संदीप शिंदे, हरीश शिरभाते, प्रशांत टोणे, पुरुषोत्तम शेलोकर, प्रकाश केदार, सोनाली मिठे, मोनिका मुंदे, सोनाली दुबे, बेबी किरपान यांनी केले.
दूरसंचारला नो-रिस्पॉन्स
बीएसएनएल अप्लॉईज युनियन, नॅशनल फेडरेशन आॅफ टेलिकॉम एम्प्लॉईज, बीएसएनएल मजदूर संघ, टेलिकॉम एम्प्लॉईज प्रोग्रेसीव्ह युनियनच्या नेतृत्वात दूरसंचार कर्मचाºयांनीही संप पुकारला आहे. धामणगाव मार्गावरील कार्यालयापुढे निदर्शने केली. सार्वजनिक वितरण प्रणालीचे खासगीकरण थांबवून रोजगार निर्मितीवर भर द्यावा, कामगारांना सामाजिक सुरक्षा द्यावी आदी मागण्या आहेत. या आंदोलनात जिल्हा सचिव शंतनू शेटे, अजय दामले, सुनील बेनोडेकर, सचिन त्रिवेदी, महंमद नसीम, विष्णू अंकतवार, विमल गायकवाड, सिंधू टेकाडे, शारदा घोटेकर, शुभांगी गायकवाड, रेखा कपाटे, वर्षा गुजर सहभागी होते.
पोषण आहार थांबला
साडेचार वर्षात कष्टकरी वर्गाकडे सरकारने डोळेझाक केल्यामुळे आयटकच्या नेतृत्वात अंगणवाडीतार्इंनी संप पुकारला आहे. त्यामुळे गावपातळीवरील पोषण आहाराचे वितरण थांबले आहे. लसीकरण मोहिमेवरही परिणाम झाला आहे. सव्वादोन लाख बालकांचा पोषण आहार मिळेनासा झाला आहे. आंदोलकांनी बसस्थानक चौकात निदर्शने केली. अंगणवाडी व बालवाडी दोन दिवस बंद राहणार आहे. केंद्राने जाहीर केलेली मानधन वाढ राज्यात लागू करावी, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगारांना दहा हजार रुपयांच्या पेंशनचा कायदा लागू करा, रेशन कार्डवर ३५ किलो धान्य मिळावे, पंतप्रधान आवास योजनेत समावेश करावा, स्वामीनाथन आयोग लागू करा आदी मागण्या आयटकने केल्या आहेत. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे, सचिव संजय भालेराव, कार्याध्यक्ष दिवाकर नागपुरे, सरचिटणीस ज्योती रत्नपारखी, गया सावळकर, ममता भालेराव, रंजना जाधव, पल्लवी रामटेके, अलका तोडसाम यांनी केले.
ग्राहक झाले कॅशलेस
राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात बँकांचा संप असल्याने बहुतांश ग्राहकांना फटका बसला. जुने एटीएम कार्ड ब्लॉक असताना बँकाही बंद असल्याने खात्यात पैसे असूनही नागरिकांना काढता आले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

आज जेलभरो
आयटकच्या नेतृत्वात बुधवारी यवतमाळात जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलक रस्त्यावर उतरणार आहे. शासनाचा निषेध करीत स्वत:ला अटक करवून घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आॅनलाईन औषध विक्रीचा विरोध
डिस्ट्रीक केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नेतृत्वात औषध विक्रेत्यांनी हल्लाबोल आंदोलन केले. आॅनलाईन औषध विक्री समाजाच्या हिताची नाही. त्यातून औषधांचा दुरुपयोग वाढणार आहे. न्यायालयाचाही निर्णय तसाच आहे. त्यामुळे आॅनलाईन औषध विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष पंकज माणवाणी, संजय बुरले, गजानन बट्टावार, सुरज डुबेवार यांच्यासह अनेक औषध विक्रेते उपस्थित होते.

Web Title: Employee strikes in the face of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.