पांढरकवडा रूग्णालयाचा कारभार मंत्र्यांच्या दरबारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:28 PM2018-01-10T22:28:38+5:302018-01-10T22:29:17+5:30
येथील उपजिल्हा रूग्णालयाला रिक्तपदाचे ग्रहण लागले असून त्यामुळे रूग्णांचे अक्षरश: हाल सुरू आहे. हे रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत एका सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट आरोग्यमंत्र्यांनाच साकडे घातले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : येथील उपजिल्हा रूग्णालयाला रिक्तपदाचे ग्रहण लागले असून त्यामुळे रूग्णांचे अक्षरश: हाल सुरू आहे. हे रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत एका सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट आरोग्यमंत्र्यांनाच साकडे घातले आहे.
जिल्हा पातळीवर वारंवार निवेदन देऊनही रिक्त पदे भरली जात नसल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय झोटींग यांनी आरोग्यमंत्र्यांना निवेदन दिले. या निवेदनातून झोटींग यांनी उपजिल्हा रूग्णालयातील समस्यांचा पाढाच वाचला. येथील उपजिल्हा रूग्णालयातील अपुरे वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाºयांमुळे रूग्णांना तातडीने आवश्यक वैद्यकीय सेवाव मिळण्यास विलंब होतो. परिणामी सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेल्या या रूग्णालयातील समस्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. १३ वैद्यकीय अधिकाºयांच्या जागा येथे मंजुर असताना यातील एकही वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याचे झोटींग यांनी निवेदनात नमूद केले आहे. अनेक वैद्यकीय अधीक्षक तर मुख्यालयी हजरच राहत नाही. जे वैद्यकीय अधिकारी प्रामाणीकपणे आपले कर्तव्य बजावतात, त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. क्ष-किरण यंत्रापासून सर्वच अत्यावश्यक सामग्री याठिकाणी उपलब्ध आहे. परंतु हे यंत्र चालविणारे तंत्रज्ञच रूग्णालयात नाहीत. त्यामुळे ही यंत्रे तशीच धूळ खात पडून आहेत. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते संजय झोटींग यांनी अनेकदा वरिष्ठ अधिकाºयांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवून निवेदने दिली. परंतु रिक्त पदे भरण्यासाठी आजवर कार्यवाही झाली नाही.