‘झेड’पी अध्यक्षांना कर्मचाऱ्यांचा झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:23 PM2018-01-24T23:23:30+5:302018-01-24T23:23:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्याने चक्क अध्यक्षांच्या जवळच्या संस्थेची फाईल बासनात गुंडाळून त्यांना झटका दिला. यामुळे जिल्हा परिषदेत चर्चेला पेव फुटले.
आर्णी येथे एक मूकबधीर निवासी शाळा आहे. जिहा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांचे पती या संस्थेचे अध्यक्ष असून त्यासुद्धा संस्थेच्या संचालक असल्याचे सांगितले जाते. संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सर्व सोपस्कार करून समाजकल्याण विभागाकडे मूल्यनिर्धारणाची फाईल टाकली. मात्र एका कर्मचाऱ्याने त्यात अनेक त्रुटी काढून ती बासनात गुंडाळून ठेवली. त्यात सदर नस्ती लिगल कागदावर योग्य स्वरूपात सादर करावी, असे नमूद केले. ही फाईल बासनात गुंडाळून ठेवल्याचे माहित होताच अध्यक्षांच्या वर्तुळात खळबळ उडाली.
फाईल बासनात गेल्याचे लक्षात येताच अध्यक्षांच्या स्वीय सहायकांची तारांबळ उडाली. त्यांनी संबंधित कर्मचाºयाशी संपर्क साधून फाईलबाबत विचारणा केली. तरीही संबंधित कर्मचाऱ्याने निगरगट्टपणे उत्तरे दिली. मात्र ती फाईल परिपूर्ण असल्याचे सांगितले गेले. तरीही कर्मचाऱ्याने ती बासनात गुंडाळल्याने अध्यक्षांच्या वर्तुळात संताप व्यक्त केला गेला. अखेर काही वेळातच ती फाईल अध्यक्षांच्या कक्षाकडे परत आली. आता त्रुट्या दुरूस्त करून ती फाईल पुन्हा समाजकल्याण विभागाकडे पाठविण्यात आली आहे. ही फाईल निकाली निघून बुधवारी सायंकाळपर्यंत परत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
पदाधिकाऱ्यांपेक्षा कर्मचारीच वरचढ
आर्णीची फाईल त्रुट्या काढून बासनात गुंडाळल्याने पदाधिकाऱ्यांपेक्षा कर्मचारी वरचढ ठरल्याचे दिसून येत आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये एकसूत्रता नसल्याने अधिकारी, कर्मचारी वरचढ झाल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले. आता नवीन सीईओ येऊनही त्यात फरक पडल्याचे दिसत नाही. त्यामुळे पदाधिकाºयांचा वचक संपल्याची चर्चा आहे.
सीईओंनी केले कामकाज सुरू
नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी मंगळवारपासून फाईली निकाली काढण्याचे काम सुरू केले. मंगळवारी त्यांनी विविध फाईली तपासून त्यावर प्रथमच स्वाक्षरी केल्याचे सांगितले जाते.