कर्मचाऱ्यांचे हलचल रजिस्टरच गायब
By admin | Published: August 4, 2016 12:58 AM2016-08-04T00:58:50+5:302016-08-04T00:58:50+5:30
जिल्हा परिषदेच्या अनेक विभागातून हलचल रजिस्टरच गायब झाले आहे. बुधवारी काही विभागात या रजिस्टरबाबत विचारणा केली असता,
जिल्हा परिषद : शासकीय वेळेत कर्मचारी राहतात खासगी कामात व्यस्त
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या अनेक विभागातून हलचल रजिस्टरच गायब झाले आहे. बुधवारी काही विभागात या रजिस्टरबाबत विचारणा केली असता, ते नेमके कुठे ठेवले आहे, याबाबत बहुतांश कर्मचारी अनभिज्ञ आढळले.
मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेचा थेट जनतेशी संबंध येतो. शासनाच्या विविध योजना याच स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत राबविण्यात येतात. जनतेचे प्रतिनिधी याच सभागृहात निवडून येतात. ते आपल्या परिसरातील समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपयोग करतात. त्यातून ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न होतो. तथापि सध्या अनेक योजना थेट ग्रापंचायतीमार्फत राबविण्यात येत असल्याने अलिकडे या संस्थेचे महत्त्व कमी होऊ लागले आहे.
जिल्हा परिषदेचा पसारा खूप मोठा आहे. विविध विभाग आहेत. या विभागांमध्ये शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना शासन निर्णयानुसार विविध सुट्या आणि हक्काच्या रजाही मिळतात. ही सुविधा असूनही अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळेतही आपले वैयक्तीक काम उरकताना दिसतात. रजा न घेता ते अनेकदा कार्यालयातून गायब होतात. जिल्ह्यातून आलेल्या ग्रामस्थांनी त्या विभागात विचारणा केली असता, त्यांना संबंधित कर्मचारी अमुक बैठकीला गेले, तमुक ठिकाणी कामानिमित्त गेले, साहेबांकडे गेले, दौऱ्यावर गेले, अशी उत्तरे दिली जातात.
वास्तविक कार्यालयातून बाहेर पडताना कर्मचाऱ्याला हलचल रजिस्टरवर तो नेमका कोणत्या कामासाठी कुठे जात आहे, याचे लेखी विवरण लिहिणे आवश्यक असते. मात्र बहुतांश विभागात हलचल रजिस्टर कुठे ठेवले आहे, हेच त्यांना माहिती नाही. माहित असले, तरी त्यावर नोंद करणे त्यांच्या सोयीचे नसते. त्यामुळे कुणीही कधीच या रजिस्टरला विचारत नाही. त्यामुळे त्या विभागातील कर्मचारी नेमका कुठे गेला, हे विभाग प्रमुखालाही अनेकदा माहिती नसते. (शहर प्रतिनिधी)