अतिक्रमणधारकांना मिळणार हक्काचे घरकूल
By admin | Published: March 17, 2017 02:40 AM2017-03-17T02:40:40+5:302017-03-17T02:40:40+5:30
शहरातील सुमारे १२०० अतिक्रमणधारकांना हक्काचे घरकूल मिळणार आहे. त्यादृष्टीने नगरपरिषदेने पावले उचलली आहेत.
१२०० घरे : नागपूर रोडवरील डम्पिंगच्या दहा एकर जागेवर उभारणार तीन मजली वास्तू, नंतर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात
यवतमाळ : शहरातील सुमारे १२०० अतिक्रमणधारकांना हक्काचे घरकूल मिळणार आहे. त्यादृष्टीने नगरपरिषदेने पावले उचलली आहेत.
शहरातून बाहेर जाणाऱ्या काही मुख्य मार्गालगत अनेकांनी अतिक्रमण करून घरे उभारली. दारव्हा रोड, कॉटन मार्केट, शासकीय रूग्णालय आदी परिसरात असे अनेक अतिक्रमणधारक आहेत. शहरातील यासह इतर परिसराचे नगरपरिषदेतर्फे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यातून सुमारे १२०० कुटुंबांना पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत हक्काचे घरकुल देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जागा निश्चितीही झाली आहे. आता केवळ प्रत्यक्षात बांधकाम सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
या घरकुलांसाठी नागपूर बायपासलगतची डंपींग ग्राउंडची १० एकर जागा निश्चित करण्यात आली. तेथे सुमारे १२०० घरकुल उभारण्यात येणार आहे. जी-२ टाईपमध्ये हे बांधकाम होणार आहे. तळमजला धरून तीन मजल्यांची वास्तू तेथे उभारण्यात येणार आहे. त्यात या १२०० कुटुंबांना प्रत्येकी ३२५ चौरस फुटांचे हक्काचे घरकुल मिळणार आहे.
विशेष म्हणजे त्यांना अगदी मोफत त्याचा लाभ घेता येणार आहे. येत्या काही दिवसांतच या बांधकामाला सुरूवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यानंतरच्या टप्प्यात आणखी काही घरकुले बांधली जाणार आहे. त्यासाठी नगरपरिषदेने वडगाव व पिंपळगाव परिसरातील प्रत्येकी दोन, तर लोहारा, मोहा आणि भोसा परिसरातील प्रत्येकी एका जागेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. या सर्व जागा शासकीय मालकीच्या असून ई क्लास जमिनी आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी या जागेची मोजणी करून देण्याबाबत भूमिअभिलेख विभागाला पत्रही दिल्याची माहिती आहे. त्यानंतर जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. (शहर प्रतिनिधी)