चिकणी पशुचिकित्सालयात कंत्राटदाराचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 11:52 PM2018-09-05T23:52:52+5:302018-09-05T23:53:27+5:30
तालुक्याच्या चिकणी(डोमगा) येथील पशुचिकित्सालयात कंत्राटदाराने अतिक्रमण केले आहे. मागील आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराविषयी कुणीही कारवाई केली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तालुक्याच्या चिकणी(डोमगा) येथील पशुचिकित्सालयात कंत्राटदाराने अतिक्रमण केले आहे. मागील आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराविषयी कुणीही कारवाई केली नाही. या कंत्राटदाराने पशुचिकित्सालयाला कंपाऊंडही करून टाकले आहे. आता काही जागरूक नागरिकांनी कंत्राटदाराचे अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी लाऊन धरली आहे.
चिकणी(डोमगा) येथे पशुचिकित्सालयाची इमारत उभी करण्यात आली. मात्र या इमारतीचे हस्तांतरण झाले नाही. आजही खुल्या जागेत पशुचिकित्सा केली जात आहे. हीच संधी कंत्राटदाराने साधली आहे. त्याने या इमारतीमध्ये आपला पसारा मांडला आहे. विशेष म्हणजे, या कंत्राटदाराचे चिकणी(डोमगा) गावात स्वत:च्या मालकीचे घर आहे. संबंधित विभाग या कंत्राटदारावर एवढा मेहरबान का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.विशेष म्हणजे, सदर गाव एका प्रसिद्ध राजकीय व्यक्तीचे आहे. त्यांच्याच घरासमोर खुल्या जागेत पशुचिकित्सा केली जाते. त्यांच्याकङ्मूनही यासंदर्भात कुठलीही पाऊले उचलली गेली नसल्याची तक्रार या गावातील नितीन डोंगरे यांनी संबंधितांकडे केली आहे. सदर अतिक्रमण काढावे, अशी मागणी त्यांच्यासह गावातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान, पशुचिकित्सालयात कंत्राटदाराने अतिक्रमण केल्याच्या प्रकाराला सरपंच दिलीप जाधव यांनीही दुजोरा दिला आहे.