वणीतील जत्रा मैदानावर अतिक्रमणाचा सपाटा सुरू
By admin | Published: November 3, 2014 11:33 PM2014-11-03T23:33:47+5:302014-11-03T23:33:47+5:30
वणी शहरात दरवर्षी गुढी पाडव्यापासून जवळपास ३५ दिवस चालणारी जत्रा भरते. या जत्रेसाठी खास ३५ एकरांचे मैदान उपलब्ध आहे. मात्र आता नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे या मैदानावर अतिक्रमणाचा
वणी : वणी शहरात दरवर्षी गुढी पाडव्यापासून जवळपास ३५ दिवस चालणारी जत्रा भरते. या जत्रेसाठी खास ३५ एकरांचे मैदान उपलब्ध आहे. मात्र आता नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे या मैदानावर अतिक्रमणाचा सपाटा सुरू असल्याने भविष्यात हे मैदानच नामशेष होण्याची भीती वर्तविली जात आहे.
नगरपरिषदेजवळ तब्बल ३५ एकरांचे भव्य यात्रा मैदान आहे़ या मैदानावर दरवर्षी रंगनाथ स्वामींच्या नावाने जत्रा भरते़ यावेळी भरणारा बैलबाजार विदर्भात ख्यातीप्राप्त आहे़ या मैदानावर आता अतिक्रमणाचा सपाटा सुरू असल्याने हे मैदान दिवसेंदिवस छोटे होत आहे. येत्या काही वर्षांत जत्रेसाठी मैदान शिल्लक राहील की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे रंगनाथ स्वामी जत्रेपासून नगरपरिषदेला चांगले उत्पन्नही मिळते.
याच जत्रा मैदानावर दरवर्षी दसरा महोत्सव होतो़ आता या मैदानाकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे़ या मैदानाच्या ऐन मध्यभागी हनुमान मंदिर बांधले गेले आहे. त्यासाठी मैदानाची बरीच जागा व्यापली गेली आहे़ या मंदिरात सभा मंडप, स्वयंपाकगृहाची व्यवस्था आहे. परिणामी मंदिर समिती हे सभागृह मंगल कार्यासाठी किरायाने देऊन उत्पन्न प्राप्त करीत आहे. तथापि त्या जागेचा कर मात्र नगरपरिषद भरते. विशेष म्हणजे नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता, या परिसरात दारू दुकाने, बीअर बार, सिनेमा टॉकिज, आरामशीन थाटण्यात आली आहे.
वणीची जत्रा जवळपास महिनाभर सुरू राहाते. रंगपंचमीपर्यंत ही जत्रा सुरू राहाते. या जत्रेला पूर्वी खूप गर्दी होत होती. आता मात्र मनोरंजनाची साधने घरीच उपलब्ध झाल्याने अनेकांनी जत्रेकडे पाठ फिरविली आहे. त्यातच जत्रेत नेहमी येणारे संगीत कलापथक बंद झाल्यानेही जत्रेवर अवकळा आली आहे. तरीही परिसरातील अनेक नागरिक या जत्रेला दरवर्षी हजेरी लावत असतात. शहरातील नागरिकही विरंगुळा म्हणून जत्रेला भेट देत असतात. आता मात्र तेथे योग्य सुविधा मिळत नसल्याने अनेक जण जत्रेत जाण्याचे टाळतात.
जत्रेसाठी ३५ एकरांचे मैदान असूनही जत्रेत सुटसुटीत जागा नसते. दाटीवाटीने दुकाने लागलेली असतात. तेथे सतत धूळही उडत असते. साधे पाणी मारण्याची तसदी कुणी घेत नाही. धुळीमुळे वातावरणात प्रदूषण होते. नागरिकांच्या शरीरात धुळीचे कण जाऊन त्यांना त्रास सहन करावा लागतो. विस्तीर्ण मैदान असूनही त्याची योग्य देखभाल होत नसल्याने हे परिस्थिती ओढवली आहे. हे मैदान दिवसेंदिवस छोटे होत असल्याने भविष्यात तर तेथे खरच जत्रा भरणार की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)